West Bengal : आपल्या कुटुंबावरील प्रेमासाठी पुरुष रात्रंदिवस मेहनत करतो. पण, कधीकधी त्याला कुटुंबाकडून तेवढेच प्रेम वा आदर मिळत नाही. उलट त्याला आपल्याच कुटुंबामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी आपली एक किडनी विकली. पण, त्यानंतर त्याला असा धक्का बसला की, ज्याचा त्याने विचारही केला नव्हता.
पैसे घेऊन पत्नी प्रियकरासह फरारपश्चिम बंगालच्या हावडा येथील या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. संकरेल येथे राहणाऱ्या एका महिलेने आधी तिच्या पतीला किडनी विकण्यास भाग पाडले आणि नंतर किडनीचे पैसे घेऊन प्रियकरासह पळून गेली. या व्यक्तीला त्याच्या किडनीसाठी 10 लाख रुपये मिळाले होते. या घटनेने त्या व्यक्तीला जबर धक्का बसला आहे. किडनी गेली, पत्नी गेली अन् पैसेही गेले. आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याच्या त्याच्या स्वप्नांचा भंग झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेची बराकपूरमधील एका व्यक्तीशी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि संपूर्ण कट रचला. पत्नी पळून गेल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही शोधून काढले. तो माणूस आपल्या 10 वर्षांच्या मुलीला बराकपूरला पत्नीकडे घेऊन गेला. पण, पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.
हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले...हे कलयुग आहे आणि कलियुगच्या पत्नीकडून दुसरी काय अपेक्षा करावी. दुसऱ्या यूजरने लिहिले...फेसबुक प्रेम जास्त काळ टिकत नाही. तर आणखी एकाने लिहिले...महिलेने लाज विकून खाल्ली असेल.