Shashi Tharoor on Indian Diplomacy : तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात दोन गट पडले. एकाने रशियाची बाजू घेतली, तर दुसऱ्याने युक्रेनची बाजू घेतली. अशा कठीण प्रसंगी भारताने तटस्थ राहण्याचा निर्मय घेतला. यापूर्वी भारताच्या याच धोरणावर टीका करणारे काँग्रेस नेते शशी थरुर आता भारताचे कौतुक करत आहेत. थरुर यांनी मान्य केले की, भारताच्या संतुलित मुत्सद्देगिरीमुळेच जागतिक स्तरावर आपल्या देशाचे महत्त्व वाढले आहे.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारताच्या तटस्थ धोरणावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी टीका केली होती. पण, आता थरुर यांची नवी प्रतिक्रिया आली आहे. भारताच्या धोरणाबाबत त्यांनी केलेली पूर्वीची टीका चुकीची असल्याचे त्यांनी मान्य केले आणि आजच्या परिस्थितीत हे धोरण यशस्वी होताना दिसत असल्याचे म्हटले. ते म्हणाले, 'मी अजूनही माझ्या चेहऱ्यावरील डाग पुसत आहे, कारण फेब्रुवारी 2022 मध्ये संसदीय चर्चेत मी एकमेव व्यक्ती होतो, ज्याने आंतरराष्ट्रीय सनद आणि तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या आधारे भारतीय भूमिकेवर टीका केली होती.'
भारताच्या धोरणामुळे राजनैतिक ताकद वाढली
रायसीना डायलॉगमध्ये बोलताना शशी थरूर म्हणाले की, जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा मी भारताच्या भूमिकेवर टीका केली होती आणि हे आंतरराष्ट्रीय सनद आणि तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. परंतु आता तीन वर्षांनंतर मला वाटते की, भारताच्या धोरणामुळे देश मजबूत राजनैतिक स्थितीत आला आहे. भारताच्या धोरणामुळे पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष, या दोघांनाही दोन आठवड्यांच्या कालावधीत भेटू शकले. ही परिस्थिती भारताला जागतिक शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी देते, जी जगातील फार कमी देशांना प्राप्त आहे.
भारताच्या धोरणावर यापूर्वी केली होती टीका रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला शशी थरुर हे रशियाबद्दल भारताच्या राजनैतिक तटस्थतेचे आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणाचे मोठे टीकाकार होते. त्यांनी नैतिकदृष्ट्या चुकीचे वर्णन केले होते आणि युक्रेनवरील हल्ल्याचा उघडपणे निषेध करण्याचे भारताला आवाहन केले होते. परंतु आता भारताच्या धोरणामुळे दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे शक्य झाल्याचे आणि यापूर्वी केलेली टीका चुकीची असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.