Shashi Tharoor: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण तापले आहे. एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे भाजपने काँग्रेसवर वारंवार संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या सर्व गदारोळावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली.
शशी थरुर यांनी भाजप-काँग्रेसला फटकारलेअमित शाहांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसद परिसरात निदर्शने केली. यावेळी भाजपचे खासदारदेखील काँग्रेसविरोधात निदर्शने करत होते. यावेळी भाजप-काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली, ज्यात दोन खासदार जखमी झाले. याबाबत बोलताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणाले की, 'दुर्दैवाने बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आणि संविधान हेच राजकीय रणांगण बनले आहे.'
'दोन्ही बाजूने अयोग्य गोष्टी सुरू आहेत. आपल्याला भविष्यातील समस्यांवर पुढे जाण्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भाषणाचा व्हिडिओ योग्य नसेल, तर त्यांनी खरा व्हिडिओ सादर करावा,' असे आव्हान थरुर यांनी यावेळी दिले.
काँग्रेसने केली कारवाईची मागणी काही काँग्रेस खासदारांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले अन् भाजपच्या खासदारांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. या पत्रावर काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, मुख्य व्हीप कोडिकुनिल सुरेश, व्हिप मणिकम टागोर आणि इतर काही सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.