शारदा चिटफंड घोटाळा : चिदंबरम यांच्या पत्नीची सीबीआयकडून चौकशी
By Admin | Updated: September 22, 2014 03:17 IST2014-09-22T03:17:00+5:302014-09-22T03:17:00+5:30
कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात शनिवारी सीबीआयने माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांची चौकशी केली.

शारदा चिटफंड घोटाळा : चिदंबरम यांच्या पत्नीची सीबीआयकडून चौकशी
नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात शनिवारी सीबीआयने माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांची चौकशी केली.
नलिनी चिदंबरम या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. शारदा समूहातर्फे नलिनी यांना देण्यात आलेल्या कायदेशीर शुल्काच्या(लीगल फी)संदर्भात सीबीआयने शनिवारी सायंकाळी त्यांची चौकशी केली, असे सीबीआयच्या सूत्राने सांगितले.
काँग्रेस नेते मातांग सिंग यांची पत्नी मनोरंजना सिंग यांच्या विनंतीवरून आपण नलिनी चिदंबरम यांची सेवा घेतली होती, असे सध्या कारागृहात असलेला शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्त सेन याने सीबीआय अधिकाऱ्यांना याआधी सांगितलेले होते. गेल्या वर्षी सेन याने सीबीआयला एक पत्रही लिहिले होते, ज्यात त्याने शारदा समूहातर्फे लीगल फीच्या रूपात नलिनी चिदंबरम यांना एक कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता. नलिनी यांनी मनोरंजना यांचे प्रतिनिधित्व केले असल्याकारणाने ईशान्येकडील एक टीव्ही चॅनल शारदा समूहाने विकत घेण्याच्या संदर्भात त्यांचा कायदेशीर सल्ला मागण्यात आला होता. हे टीव्ही चॅनल विकत घेण्यासाठी त्यात ४२ कोटी रुपये न गुंतविण्याचा सल्ला नलिनी यांनी शारदा समूहाला दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)