शांतीदेव यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:35+5:302015-01-22T00:07:35+5:30

- डॉ. वांगचूक दोरजी नेगी : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमाला

Shantidu explained the philosophy of Buddha | शांतीदेव यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले

शांतीदेव यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले

-
ॉ. वांगचूक दोरजी नेगी : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमाला
नागपूर : शांतीदेव यांनी केलेली साधना समाजाला एक नवी दिशा देणारी होती. प्रत्येक धर्म, जातीतील लोकांची मानसिकता सकारात्मक करण्याचे काम त्यांनी बुद्ध धम्माच्या माध्यमातून केले. भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केले आणि त्यांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत ते सहजपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकालाच सुख हवे असते पण सुख आणि दु:ख आपली मानसिकताच ठरवित असते. हे त्यांनी समजावून सांगितले आणि लोकांना जगण्याचा मंत्र दिला, असे मत सारनाथ, वाराणसी येथील डॉ. वांगचुक दोरजी नेगी यांनी व्यक्त केले.
पवित्र दीक्षाभूमी येथे आयोजित बुद्ध महोत्सवात रत्नावली व्याख्यानमालेत आचार्य शांतीदेव यांच्या जीवनचरित्रावर ते बोलत होते. आयुष्यात दु:खी कुणीच होऊ इच्छित नाही. पण खरे सुख मिळविण्यासाठी महापुरुषांचे चरित्र समजून घेतले पाहिजे. प्रयास केला तर आपणही आपली मानसिकता बदलू शकतो. त्यासाठी प्रयत्नात सातत्य असले पाहिजे. प्रत्येकातच बुद्ध होण्याची क्षमता आहे पण आपण आपली ताकद ओळखत नाही. शांतीदेवानी ही क्षमता ओळखली आणि ते बुद्ध झाले. त्यासाठी बुद्धाजवळ आपले मन एकाग्र करावे लागते. चुकीच्या मार्गावर आपले मन एकाग्र झाले तरीही तत्कालिक आनंद मिळतो. योग्य मार्गाने आपण सकारात्मकतेने मन एकाग्र केले तर चिरंतन आनंद मिळतो. आचार्य शांतीदेवांनी बुद्धाची साधना केली आणि ते बुद्ध झाले. जो आनंद तत्कालिक आहे तो खरा आनंद नाही. चुकीच्या परंपरेचे पालन केले तर तत्कालिक सुख मिळाले तरी अंतत: दु:खच मिळते, हा विचार आचार्यांनी समाजात रुजविला.
भगवान बुद्ध आणि आचार्य शांतीदेव यांच्या चरित्रात एक समानता आहे. दोघेही राजपुत्र होते पण त्यांचा जन्म वनात झाला. आचार्य सौराष्ट्रचे राजा राजा कल्याण वर्मा यांचे पुत्र होते. नांलदाच्या कुशल देव यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांनीच आचार्यांना शांतीदेव हे नाव दिले. साऱ्या भौतिक सुखावर लाथ मारूनही त्यांनी आपला आनंद शोधला. बाबासाहेब आंबेडकरांनीही गरीब घरातच जन्म घेतला आणि तमाम गरीब, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांचे हे महान कार्य जगात सर्वाधिक महत्त्वाचे आहे. जेथे त्यांनी दीक्षा घेतली त्याच भूमीवर हा बुद्ध महोत्सव होतो आहे, ही बाबही अतिशय महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Shantidu explained the philosophy of Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.