शाहरुख राहतो भारतात, ‘हृदय’ मात्र पाकिस्तानात!
By Admin | Updated: November 4, 2015 09:28 IST2015-11-04T01:27:18+5:302015-11-04T09:28:53+5:30
अभिनेता शाहरुख खान हा भारतात राहत असला तरी त्याचे ‘हृदय’ मात्र पाकिस्तानात आहे, अशा शब्दांत भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मंगळवारी शाहरुखवर टीका केली.

शाहरुख राहतो भारतात, ‘हृदय’ मात्र पाकिस्तानात!
नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खान हा भारतात राहत असला तरी त्याचे ‘हृदय’ मात्र पाकिस्तानात आहे, अशा शब्दांत भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मंगळवारी शाहरुखवर टीका केली. तर, केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते
प्रकाश जावडेकर यांनी विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.
देशात मोठ्या प्रमाणात असहिष्णुता वाढली आहे, असे शाहरुखने सोमवारी म्हटले होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना, शाहरुख हा ‘राष्ट्रविरोधी’ असल्याचे विजयवर्गीय म्हणाले. वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला भाजपाने आपल्या नेत्यांना दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करीत विजयवर्गीय यांनी शाहरुखबाबत हे वादग्रस्त टिष्ट्वट केले. ते म्हणाले, ‘शाहरुखचे चित्रपट येथे कोट्यवधी रुपये कमावतात, तरीही भारत असहिष्णू आहे असे त्याला वाटते.
हे राष्ट्रविरोधी नाही तर मग दुसरे काय आहे? भारत संयुक्त राष्ट्राचा स्थायी सदस्य बनण्याचा प्रयत्न करीत आहे आणि पाकिस्तानसह सर्व भारतविरोधी शक्ती कटकारस्थान रचत आहेत. असहिष्णुतेबद्दलचे शाहरुखचे वक्तव्य हे पाकिस्तान आणि भारतविरोधी शक्तींच्याच सुरात सूर मिसळणारे आहे.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)