सरकारला प्रत्युत्तरासाठी ‘शॅडो’ समित्या
By Admin | Updated: November 8, 2014 03:46 IST2014-11-08T03:46:25+5:302014-11-08T03:46:25+5:30
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा नाकारण्यात आल्यानंतरही न डगमगता काँग्रेसने विविध मंत्रालयांच्या ७ शॅडो समित्या(छाया समित्या) स्थापन करीत सरकारला प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे

सरकारला प्रत्युत्तरासाठी ‘शॅडो’ समित्या
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा नाकारण्यात आल्यानंतरही न डगमगता काँग्रेसने विविध मंत्रालयांच्या ७ शॅडो समित्या(छाया समित्या) स्थापन करीत सरकारला प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे. प्रभावी विरोधकाची भूमिका बजावण्यासाठी या पक्षाने टिष्ट्वटर हाताळण्याची जबाबदारीही एका समितीवर सोपविली, हे विशेष.
हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात आक्रमक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या पक्षाने मुलायमसिंह यांच्या नेतृत्वातील आघाडीची मदत घेण्यास वावगे नसल्याचे स्पष्ट केले आहे. लोकशाहीत विरोधकाची भूमिका मजबूत असणे गरजेचे आहे. विरोधक एकसुरात जनहिताचे मुद्दे, लावून धरत सरकारला लगाम लावण्याचे काम करेल, यात काँग्रेसला आनंद आहे, असे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले.
काँग्रेसने ‘वॉच डॉग’च्या रुपात सात गट बनविले असून त्यांना मंत्रालयांच्या कामकाजावर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.
संपुआ सरकारच्या काळात ज्या नेत्यांकडे मंत्रालयाची जबाबदारी
होती त्यांनाच हे काम सोपविण्यात आले आहे. त्यांचा अनुभव आणि संपर्क याचा पर्याप्त वापर हा त्यामागचा उद्देश आहे. अशाच प्रकारचा प्रयोग विरोधी बाकांवरील जनसंघाने बराच आधी महाराष्ट्रात केला होता. त्याची आता पुनरावृत्ती होणार आहे.