In the seventeenth Lok Sabha, 475 MPs are crorepatis | सतराव्या लोकसभेमध्ये ४७५ खासदार करोडपती
सतराव्या लोकसभेमध्ये ४७५ खासदार करोडपती

नवी दिल्ली : नव्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्यांपैकी ४७५ खासदार करोडपती आहेत. त्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत खासदार आहेत. त्यांच्याकडे ६६० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही माहिती असोसिएशन आॅफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दिली आहे.
५३९ नव्या खासदारांच्या संपत्ती व इतर बाबींसंदर्भात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून एडीआरने हा निष्कर्ष काढला आहे. यंदा लोकसभेत ५४२ खासदार निवडून आले आहेत. मात्र त्यातील भाजपचे दोन व काँग्रेसच्या एका खासदाराचे निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रतिज्ञापत्र एडीआरला उपलब्ध होऊ शकले नाही.
लोकसभेच्या ५४३ जागा आहेत. त्यातील वेल्लोरमध्ये धनशक्तीच्या जोरावर मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न विविध पक्षांकडून सुरू होते. त्याला अटकाव करण्यासाठी तेथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. या मतदारसंघातील निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभेत दोन सदस्य नामनियुक्त असतात. ते जमेस धरून या सभागहाच्या एकुण जागांची संख्या ५४५ होते.
नव्याने निवडून आलेल्या भाजप खासदारांपैकी ३०१ जणांची प्रतिज्ञापत्रे एडीआरने तपासली. त्यातील ८८ टक्के म्हणजे २६५ खासदार करोडपती असल्याचे आढळून आले. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे सर्व १८ खासदार कोट्याधीश आहेत. काँग्रेसच्या ५१ खासदारांपैकी ४३ खासदार, द्रमुकच्या २३ खासदारांपैकी २२, तृणमूल काँग्रेसच्या २२ खासदारांपैकी २०, वायएसआर काँग्रेसच्या २२ खासदारांपैकी १९ खासदार करोडपती असल्याचे एडीआरने म्हटले आहे.
सर्वात श्रीमंत तीन खासदार काँग्रेसचे
नव्या लोकसभेतील सर्वात श्रीमंत तीन खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यात प्रथम क्रमांकावर असलेले नकुलनाथ मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथून विजयी झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूतील कन्याकुमारीचे खासदार वसंतकुमार एच. असून त्यांच्याकडे ४१७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. या क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेल्या खासदार डी. के. सुरेश यांच्याकडे ३३८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते कर्नाटकमधील बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले आहेत. नव्या लोकसभेच्या खासदारांकडे सरासरी २०.९३ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
या सभागृहातील २६६ खासदारांकडे ५ कोटी किंवा त्याहून अधिक मालमत्ता आहे. २००९च्या लोकसभेत ३१५, २०१४च्या लोकसभेत ४४३ खासदार करोडपती होते.
>लोकसभेवर निवडून गेलेल्या २३३ जणांवर गुन्हे
लोकसभेवर निवडून गेलेल्या ५३९ खासदारांपैकी २३३ जणांवर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन आॅफ डेमोक्रॅटीक रिफॉर्म्सच्या (एडीआर) वतीने करण्यात आलेल्या विश्लेषणानंतर ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. २०१४च्या तुलनेत अशा खासदारांमध्ये यंदा २६ टक्के वाढ झाली आहे.भाजपच्या निवडून आलेल्या ११६ उमेदवारांवर, म्हणजे एकूणातील ३९ टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे आहेत. कॉँग्रेसच्या २९ खासदारांच्या (५७ टक्के) जनता दलाच्या (यूनायटेड)१३ (८१ टक्के), द्रविड मुन्नेत्र कळघमच्या १० (४३ टक्के) आणि तृणमूल कॉँग्रेसच्या ९ (४१ टक्के)खासदारांच्या नावांनी सुध्दा पोलीस डायºया भरलेल्या आहेत.२०१४ मध्ये १८५ खासदारांवर (३४ टक्के)गुन्हे दाखल होते. त्यातील ११२ जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. २००९ मध्ये ५४२ पैकी १६२(३० टक्के) खासदारांवर गुन्हे दाखल होते. त्यातही १४ टक्के लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे नोंदविले गेले होते.
>सर्वाधिक खासदारांचा व्यवसाय ‘शेती’
नव्या लोकसभेत प्रवेश केलेले जवळपास ३0 टक्के खासदार हे शेती व्यवसायाशी संबंधित आहेत. २२ टक्के खासदार हे राजकीय क्षेत्रातील आहेत. अर्थात ४१ टक्के खासदार हे याआधीच्या लोकसभेत असलेलेच असल्यामुळे ही माहिती तथ्याशी जुळत नाही. ८२ खासदारांनी म्हणजे जवळपास १५ टक्के खासदारांनी त्यांचा प्राथमिक व्यवसाय हा उद्योगाशी संबंधित असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये स्टील, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन्स आणि इतर व्यवसायाचा समावेश आहे. २0१४ मध्ये १0 वकील आणि या व्यवसायाशी संबंधित असलेल्या खासदारांची संख्या या संसदेत १८ इतकी झाली आहे. इतर वर्गवारीत गृहिणी, खेळाडू आणि फकीर असा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांचा समावेश आहे. एका पत्रकाराचाही नव्या संसदेत प्रवेश झाला आहे.


Web Title: In the seventeenth Lok Sabha, 475 MPs are crorepatis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.