बनावट चकमकीप्रकरणी सैन्याच्या सात जवानांना जन्मठेप
By Admin | Updated: November 13, 2014 13:07 IST2014-11-13T12:47:29+5:302014-11-13T13:07:58+5:30
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात बनावट चकमक घडवून तिघा तरुणांना ठार मारणा-या सैन्यातील सात जवानांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बनावट चकमकीप्रकरणी सैन्याच्या सात जवानांना जन्मठेप
श्रीनगर, दि. १२ - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात बनावट चकमक घडवून तिघा तरुणांना ठार मारणा-या सैन्यातील सात जवानांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सर्वांना सैन्यातर्फे मिळणा-या सुविधाही बंद केल्या जाणार आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या निकालाचे स्वागत केले आहे.
कुपवाड्यातील मछिल येथे एप्रिल २०१० मध्ये मोहम्मद शफी, शाझाद अहमद आणि रियाझ अहमद या तिघा तरुणांना बनावट चकमकीत ठार मारण्यात आले होते. सैन्यातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि पाच जवानांनी ही बनावट चकमक घडवली होती. हे तिघे तरुण दहशतवादी असल्याचे भासवत ते पाकमधून भारताच्या हद्दीत घुसखोरी करत असताना ठार मारले गेले असा दावा या जवानांनी केला होता.
मात्र, मृत तरुणांच्या कुटुंबियाने या घटनेविरोधात आवाज उठवल्यावर सैन्याने चौकशीला सुरुवात केली. यामध्ये ही बनावट चकमक असल्याचे उघड झाले. याप्रकरणी सैन्याच्या विशेष कोर्टात कर्नल, मेजर आणि अन्य पाच जवानांविरोधात खटला सुरु होता. गुरुवारी या खटल्याचा निकाल आला असून सैन्याने या सातही जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २०१० मधील या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये भीषण दंगल उसळली होती व यामध्ये शेकडो निष्पापांचा बळी गेले होते.