बिहार रणसंग्रामात सात माजी मुख्यमंत्र्यांचे योद्धे
By Admin | Updated: September 25, 2015 23:53 IST2015-09-25T23:53:58+5:302015-09-25T23:53:58+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यंदा सात माजी मुख्यमंत्र्यांचे योद्धे आपली शक्ती अजमावणार आहेत.

बिहार रणसंग्रामात सात माजी मुख्यमंत्र्यांचे योद्धे
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यंदा सात माजी मुख्यमंत्र्यांचे योद्धे आपली शक्ती अजमावणार आहेत.
या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये हिंदुस्तान अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी, जनविकास मोर्चाचे अध्यक्ष जगन्नाथ मिश्र, जनता दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष सतीशप्रसाद सिंग, समाजवाटी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांचा समावेश आहे. यापैकी मांझी आणि सिंग हे बिहारसाठी परिचित असले तरी त्यांनी प्रथमच आपल्या पक्षाला निवडणूक आखाड्यात उतरविले असून त्यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा असणार आहे. लोकांच्या नजरा त्यांच्यावर आहेत. स्वत: मांझी दोन विधानसभा मतदारसंघातून भविष्य अजमावीत आहेत. रालोआचा मुख्य घटक भाजपकडून माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांचे पुत्र व माजी मंत्री नितीश मिश्रा, आणि याच आघाडीतील हमचे माजी मुख्यमंत्री मांझी यांचे पुत्र संतोष मांझी रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री मिश्र हे मात्र निवडणूक लढविणार नाहीत.
संयुक्त जनता दलाच्या नेतृत्वातील महाआघाडीकडून माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुले तेजप्रताप आणि तेजस्वी प्रथमच निवडणूक राजकारणात उतरली आहेत. राबडीदेवी या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली असल्याने खुद्द लालूप्रसाद निवडणूक लढविणार नसले तरी त्यांच्या पक्षाचे अनेक उमेदवार आपले भविष्य अजमावीत आहेत.
माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव स्वत: निवडणूक लढवीत नसले तरी रालोआ आणि महाआघाडीविरुद्ध सहा पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करून सर्व २४३ जागांवर उमेदवार उभे करून त्यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. त्याचप्रमाणे मायावतींची बसपा स्वबळावर दंगलीत उतरली असून आपल्या पहेलवानांवर त्यांना पूर्ण विश्वास आहे.
मतदार कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांच्या योद्ध्यांना पसंती देतात हे येणारा काळच सांगेल. (वृत्तसंस्था)