सत्र परीक्षा एक आठवडा आधी
By Admin | Updated: September 22, 2014 05:06 IST2014-09-22T05:06:56+5:302014-09-22T05:06:56+5:30
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे निवडणुकीच्या कामासाठी लागलेल्या शिक्षकांमुळे प्रथम सत्र परीक्षा एक आठवडा लवकर घेण्यात येणार

सत्र परीक्षा एक आठवडा आधी
जनार्दन भेरे, भातसानगर
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे निवडणुकीच्या कामासाठी लागलेल्या शिक्षकांमुळे प्रथम सत्र परीक्षा एक आठवडा लवकर घेण्यात येणार असल्याने अभ्यासक्रम संपवण्याच्या कसरतीबरोबरच विद्यार्थ्यांवरही अभ्यासाचा ताण वाढणार आहे.
निवडणुकीच्या कामासाठी जाणाऱ्या शिक्षकांचे शिबिर शनिवारपासून शहापूर तालुक्यात सुरू होत आहे. १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठीच्या निवडणूक तयारीसाठी १४ आॅक्टोबर रोजच मतदान केंद्रांवर जावे लागणार आहे. १५ आॅक्टोबरला मतदार संपून मतपेट्या निवडणूक कार्यालयात जमा करण्यासाठी दुसऱ्या दिवशीचा रात्री बराच कालावधी लागतो. त्यामुळे १६ तारखेलाही ते कामावर हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे या वेळी होणारी प्रथम सत्र परीक्षा एक आठवडा आधी होणार आहे. त्यामुळे मिळेल तसे जास्तीतजास्त तास घेऊन अभ्यासक्रम संपवण्याची शिक्षकांची कसरत सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा ताण मात्र वाढत आहे. त्यातच तोंडी परीक्षा, वर्गपाठ, गृहपाठाच्या वह्या पूर्ण करणे, यामुळे विद्यार्थ्यांवर ताण पडत आहे.