मॅगीविरुद्धच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल
By Admin | Updated: May 30, 2015 09:07 IST2015-05-29T23:58:28+5:302015-05-30T09:07:59+5:30
नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाच्या दर्जाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने या प्रकरणात अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला लक्ष घालण्यास सांगितले आहे.

मॅगीविरुद्धच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल
नवी दिल्ली : नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाच्या दर्जाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने या प्रकरणात अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथॉरिटी आॅफ इंडिया) लक्ष घालण्यास सांगितले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाकडे तक्रार करण्यात आली तर सामूहिक खटलादेखील होऊ शकतो, असे ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी म्हटले.
उत्तर प्रदेश अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने नेस्ले इंडियाला फेब्रुवारी २०१४ मध्ये उत्पादन झालेली मॅगीची बॅच बाजारातून काढून घेण्यास सांगितले होते. मॅगीची चव वाढविणाऱ्या एमएसजीचे व शिशाचे प्रमाण निर्धारित पातळीपेक्षा जास्त असल्याचे या बॅचमध्ये (फेब्रुवारी २०१४) आढळल्यानंतर प्रशासनाने हा आदेश दिला होता. नेस्ले इंडियाने प्रशासनाच्या तक्रारीशी सहमत नसल्याचे सांगून आम्ही या प्रकरणी दाद मागू, असे म्हटले. मॅगीविरुद्धची तक्रार गंभीर असून आम्ही ती अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणकडे सोपविली आहे. सध्याच्या कायद्यानुसार या प्राधिकरणाला दंड ठोठावण्याचा आणि मोठी शिक्षा करण्याचा अधिकार आहे, असे पासवान यांनी म्हटले. वेगवेगळ्या ग्राहकोपयोगी उत्पादनाशी संबंधित तक्रारींची हाताळणी वेगवेगळे अधिकारी करतात. आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेले हे प्राधिकरण अन्न विषयाच्या तक्रारी हाताळते, असे ते म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)