सीव्हीसी, सीआयसीच्या नावांवर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: June 2, 2015 01:52 IST2015-06-02T01:52:15+5:302015-06-02T01:52:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीने सोमवारी मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि केंद्रीय माहिती आयुक्तांसह (सीआयसी) अन्य महत्त्वाच्या पदांच्या

सीव्हीसी, सीआयसीच्या नावांवर शिक्कामोर्तब
नबीन सिन्हा, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीने सोमवारी मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि केंद्रीय माहिती आयुक्तांसह (सीआयसी) अन्य महत्त्वाच्या पदांच्या नावांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे शिफारस करीत या रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग प्रशस्त केला आहे.
सीव्हीसी आणि सीआयसी ही दोन्ही पदे बऱ्याच काळापासून रिक्त होती. नावांवर मंजुरीची मोहोर उमटविण्यासाठी सोमवारी दुसरी बैठक झाली. अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे बैठकीला उपस्थित होते. एका दक्षता आयुक्ताच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रपतींकडे नावांची शिफारस करण्यात आली असून योग्य वेळी ती जाहीर केली जाईल. नावांची निवड एकमताने करण्यात आली, अशी माहिती खरगे यांनी दिली. प्रदीप कुमार निवृत्त झाल्यानंतर सीव्हीसीचे पद २८ सप्टेंबरपासून रिक्त होते.
माथूर, सौरव चंद्र, सरकार यांची नावे अग्रस्थानी
सीव्हीसी पदासाठी माजी संरक्षण सचिव आर.के. माथूर यांच्यासह सीबीडीटीचे माजी अध्यक्ष के.व्ही. चौधरी यांचे नाव अग्रस्थानी आहे. माथूर हे १९७७ च्या मणिपूर-त्रिपुरा बॅचचे अधिकारी आहेत. समितीने सीआयसी आणि सात माहिती आयुक्तांच्या नावावरही चर्चा केली. सीआयसीच्या पदांसाठी २०० अर्ज आले. माहिती आयुक्त पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या ५५० होती. सर्वात ज्येष्ठ माहिती आयुक्त विजय शर्मा यांची नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.