तृणमूल कार्यकर्त्यांच्या हल्ल्यामध्ये ज्येष्ठ मार्क्सवादी नेते जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:10 IST2018-04-08T00:10:15+5:302018-04-08T00:10:15+5:30
पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात असलेल्या पंचायतींच्या निवडणुकांच्या निमित्ताने तेथील वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर मार्क्सवादी, भाजपा व काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना उघडपणे धमकावण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आहेत.

तृणमूल कार्यकर्त्यांच्या हल्ल्यामध्ये ज्येष्ठ मार्क्सवादी नेते जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात असलेल्या पंचायतींच्या निवडणुकांच्या निमित्ताने तेथील वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर मार्क्सवादी, भाजपा व काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना उघडपणे धमकावण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आहेत. माकपचे ज्येष्ठ नेते व ९ वेळा खासदार असलेले वासुदेव आचार्य यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतकी मारहाण केली, की त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
त्यांना डोक्याला जबर मारहाण करण्यात आली असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. वासुदेव आचार्य हे शांत प्रवृत्तीचे व अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. संसदेतही त्यांनी आपल्या कामाचा व भाषणांचा ठसा उमटवला होता. त्यांची प्रकृती सुधारत असली तरी त्यांना आणखी काही काळ रुग्णालयात ठेवावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. वासुदेव आचार्य हे ७५ वर्षांचे आहेत.
वासुदेव आचार्य पक्ष कार्यकर्त्यांसह पुरुलिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तृणमूलच्या धाकधपटशाची तक्रार करण्यासाठी जात असताना ते व सोबतच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.
माकपचे आंदोलन
वासुदेव आचार्य यांना आमच्या कार्यकर्त्यांनी अजिबात मारहाण केलेली नाही, असा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालमधील पंचायतीच्या ६0 हजार जागांसाठी १, ३ व ६ मे रोजी निवडणुका होणार आहेत.
तृणमूलच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी आज कोलकात्याच्या मेयो रोडवरील गांधीजींच्या पुतळ्यापाशी धरणे धरले होते, तर माकपच्या कार्यकर्त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.