भाजपाचे ज्येष्ठ नेते बिरदीचंद नहार यांचे निधन
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
नाशिक : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कार्पोरेशनचे माजी संचालक बिरदीचंद रामचंद्र नहार (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते बिरदीचंद नहार यांचे निधन
नाशिक : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कार्पोरेशनचे माजी संचालक बिरदीचंद रामचंद्र नहार (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नहार यांच्या पश्चात पत्नी सुशीला आणि पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. वाडीवर्हे, ता. इगतपुरी येथील मूळ रहिवासी असलेल्या बिरदीचंद नहार यांनी नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून पाऊल ठेवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेल्या नहार यांनी जनसंघ ते भाजपा असा राजकीय प्रवास करत विविध पदे भूषविली. भाजपाच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीत त्यांनी अनेक वर्षे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. डॉ. गुप्ते यांच्या काळात भूतपूर्व नगरपालिकेत ते स्वीकृत नगरसेवक होते. भाजपाच्या विविध आघाड्या, समित्यांवरही त्यांनी काम पाहिले. आणीबाणीच्या काळात नहार यांना १६ महिन्यांचा कारावास झाला होता. राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही नहार यांचे मोठे योगदान राहिले. महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे ते सलग २५ वर्षे संचालक होते. नाशिक हौसिंग फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक, रविवार कारंजावरील जैन स्थानकचे विश्वस्त, जैन बोर्डिंगचे उपाध्यक्ष, निमाणी मंगल कार्यालयाचे पदाधिकारी आदि पदेही त्यांनी भूषविली. याशिवाय क्रिमिका आइस्क्रीम, हॉटेल सुरेश प्लाझा, नहार डेव्हलपर्सचेही ते संस्थापक होते. नहार यांच्या निधनाचे वृत्त कळताच भाजपासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. फोटो- आरला ०१ बिरदीचंद नहार या नावाने सेव्ह केला आहे.