सेनेची तलवार म्यान; गीतेंनी पदभार स्वीकारला
By Admin | Updated: May 29, 2014 02:55 IST2014-05-29T02:55:42+5:302014-05-29T02:55:42+5:30
केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योग खाते मिळाल्यावरून नाराज झालेल्या शिवसेनेने बुधवारी माघार घेतली. ्ालो, ुगूा, सगलगेूीब,

सेनेची तलवार म्यान; गीतेंनी पदभार स्वीकारला
नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योग खाते मिळाल्यावरून नाराज झालेल्या शिवसेनेने बुधवारी माघार घेतली. शिवसेना नेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी बुधवारी त्यांच्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारतानाच मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या पक्षाला चांगले मंत्रालय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खातेवाटपासंदर्भात समाधानकारक चर्चा झाली असून विस्तारात पक्षाला महत्त्वाचे खाते मिळेल, असे गीते यांनी मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांना ऊर्जा खाते मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्र पक्ष असतानाही पक्षाला अवजड उद्योग हे कमी महत्त्वाचे मंत्रालय देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, असे विचारले असता गीते यांनी त्याला फारसे महत्त्व दिले नाही. ते म्हणाले, मी नाराज होतो, हे वृत्त खरे नाही. आमचा पक्ष हा सर्वसामान्यांशी जोडलेला आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांशी निगडित असे मंत्रालय मिळावे, अशी उद्धव ठाकरे यांना अपेक्षा होती. यासंदर्भात त्यांनी सकाळीच पंतप्रधानांसोबत चर्चाही केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा मिळाल्या असून रालोआतील तो दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांची भारतभेट आणि खातेवाटपात अवजड उद्योग मंत्रालयासारखे दुय्यम खाते मिळाल्याने शिवसेनेत नाराजी असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. तसेच अनंत गीतेंनी यासंदर्भात कोणतेही नाटक केले नव्हते, तर ते खरोखर नाराज होते, असा दावाही त्यांनी केला. अवजड उद्योग मंत्रालय दुय्यम दर्जाचे मानण्यात येते. जनतेशी या खात्याचा थेट संबंध येत नाही, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)