फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवा - आरएसएस
By Admin | Updated: April 24, 2015 15:53 IST2015-04-24T13:27:51+5:302015-04-24T15:53:21+5:30
सरकारने फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवा - आरएसएस
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २४ - सरकारने फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फुटीरतावाद्यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी ध्वज नाचवत पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याच्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'जे लोक पाकिस्तानाच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत, त्यांना , विशेषत: फुटीरतावादी नेते आणि त्यांच्या कुटुंबियांना भारत सरकारने इथे राहण्याची परवानगी देता कामा नये' असे संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. ' यामुळे काश्मीरमधील लोकांच्या जीवनात शांतता व समृद्धी राहील. भारत सरकारने सर्व फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे', असेही त्यांनी सांगितले.
इंद्रेश कुमार हे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे (एमआरएम) संरक्षकही आहेत. एमआरएम मंचाच्या जम्मू -काश्मीर युनिटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'देशापुढील समस्या आणि त्यातील भारतीय मुस्लिमांची भूमिका ' या 'सेमिनारमध्ये बोलताना इंद्रेश कुमार यांनी हे मत व्यक्त केले. ' देशाचा व येथील लोकांच्या चांगुलपणामुळेच पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देऊनही या लोकांना इथल्या भूमीवर रहायला मिळत आहे, पण यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असे कुमार म्हणाले.
'सरकारने विकासावर लक्ष द्यावे आणि जनादेशाचा आदर राखावा' असा सल्ला कुमार यांनी जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना यावेळी दिला. 'पर्यटन, शिक्षण, आरोग्य यासह सर्व क्षेत्रातील विकासासह राज्यात सर्वत्र शांतता नांदेल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे कुमार म्हणाले.