- हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नेपाळमधील सध्याच्या स्थितीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेतृत्वाने पक्षाच्या नेत्यांना नेपाळबाबत काहीही बोलण्यापूर्वी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजप हाय कमांडने सर्व मंत्री, नेते आणि इतरांना अनौपचारिक निर्देश दिले आहेत की, नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी. हे निर्देश सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म हाताळणाऱ्यांनाही लागू आहेत.
पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्र्यांना आधीच सांगितले आहे की, त्यांनी आपापल्या मंत्रालयांबाबतच भाष्य करावे. भारत नेपाळमधील स्थितीवर भाष्य करण्याचे टाळत आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही या घडामोडींचा संदर्भघेताना खूपच काळजी घेतली आहे. ही अत्यंत नाजूक स्थिती असून, भारत कोणताही वाद निर्माण करू इच्छित नाही.
सीमावर्ती राज्यांमधील पक्ष कार्यकर्त्यांना सल्ला
भाजपने आपल्या निर्देशात स्पष्टपणे म्हटले आहे की, पक्षाच्या नेत्यांनी याबाबत कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. हा आदेश राज्यांतील नेत्यांसह मंत्र्यांना लागू आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी सीमावर्ती राज्यांमधील पक्ष कार्यकर्त्यांना अत्यंत काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चौधरी काय म्हणाले ?
नेपाळ हा भारताचा भाग असता तर शांततेत आणि आनंदात राहिला असता, असे वक्तव्य सम्राट चौधरी यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यांनी नेपाळमधील सध्याच्या स्थितीला काँग्रेसला जबाबदार धरून हे वक्तव्य केले. ते म्हणाले होते की, ही सर्व काँग्रेसची चूक आहे. काँग्रेसने दोन देशांना वेगळे ठेवले म्हणून तेथे अराजकता आहे. नेपाळ भारताचा भाग असता तर तेथेही शांतता आणि आनंदमय वातावरण असते.
पळालेल्या ६० कैद्यांची भारतीय सुरक्षा दलाकडून धरपकड
भारत-नेपाळ सीमारेषेचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा बल (एसएसबी) या सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमेजवळील विविध ठिकाणांहून सुमारे ६० जणांना पकडले असून, त्यांत बहुतांश नेपाळी नागरिक आहेत. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात तुरुंग फोडून फरार झालेले हे कैदी असल्याचा भारतीय सुरक्षा दलाला संशय आहे.
एसएसबीच्या जवानांनी गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील सीमावर्ती भागांतून या लोकांना पकडले आहे. त्यांना संबंधित राज्यांच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्यांपैकी दोन-तीन जणांनी आपण भारतीय नागरिक असल्याचे सांगितले आहे.