सोमनाथ मंदिरावरील दहशतवादी हल्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला
By Admin | Updated: March 15, 2016 18:26 IST2016-03-15T18:26:32+5:302016-03-15T18:26:32+5:30
सोमनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या हेतूने भारतात घुसखोरी केलेल्या दहशतवादयांचा सुरक्षा यंत्रणांनी खात्मा केला आहे

सोमनाथ मंदिरावरील दहशतवादी हल्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १५ - सोमनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या हेतूने भारतात घुसखोरी केलेल्या दहशतवादयांचा सुरक्षा यंत्रणांनी खात्मा केला आहे. गुजरातमार्गे भारतात घुसखोऱी केलेल्या 10 दहशतवाद्यांपैकी 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. महाशिवरात्रीला दहशतवादी हल्ले करण्याच्या हेतून हे दहशतवादी भारतात घुसले होते.
सीएनएन-आयबीएनने दिलेल्या माहितीनुसार घुसखोरी केलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. दहापैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून इतर सात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने दहा दहशतवादी घुसल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर खान जानजुआ यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला होता. महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान घातपाती कारवाया करण्याच्या इराद्याने हे दहशतवादी घुसल्याचा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी वर्तवला आहे.