काश्मिरात सुरक्षादल, आंदोलकांत चकमक
By Admin | Updated: November 5, 2014 01:26 IST2014-11-05T01:26:27+5:302014-11-05T01:26:27+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन तरुणांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही वेळात तरुणांच्या एका गटाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली.

काश्मिरात सुरक्षादल, आंदोलकांत चकमक
श्रीनगर : काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात लष्कराच्या गोळीबारात दोन तरुण ठार झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ येथे करण्यात येत असलेल्या निदर्शनादरम्यान मंगळवारी सुरक्षा दल व आंदोलकांत चकमक उडाली. पोलिसांनी या चकमकीवर नियंत्रण मिळविले असून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या भागात संचारबंदी लागू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन तरुणांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही वेळात तरुणांच्या एका गटाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या जमावाला परतवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, या भागात थोड्या थोड्या अंतराने पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक झडतच राहिली. या चकमकीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
हे दोन्ही तरुण स्थानिक रहिवासी होते. सोमवारी संध्याकाळी ५च्या सुमारास चत्तरगाम भागातून कारने जात असताना त्यांनी लष्कराच्या जवानांनी केलेल्या आवाहनाला डावलून सुरक्षा कठडे तोडून कार पुढे नेल्याने या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.
लष्कराने उभारलेल्या दोन सुरक्षा कठड्यांना पार करून हे तरुण तिसऱ्या सुरक्षा कठड्यापर्यंत पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडविण्याचा पुन्हा एकवार प्रयत्न केला. मात्र, सुरक्षेचा हा घेरा तोडून जेव्हा ते युवक पुढे जाऊ लागले तेव्हा जवानांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोघे ठार झाले तर दोघे जण जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)