एनडीएला दुसरा धक्का, एमडीएमकेने दिली सोडचिठ्ठी
By Admin | Updated: December 8, 2014 14:05 IST2014-12-08T14:05:22+5:302014-12-08T14:05:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळविरोधात असल्याची घणाघाती टीका करत एमडीएमकेने भाजपाप्रणीत एनडीए आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे.

एनडीएला दुसरा धक्का, एमडीएमकेने दिली सोडचिठ्ठी
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ८ - पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळविरोधात असल्याची घणाघाती टीका करत एमडीएमकेने भाजपाप्रणीत एनडीए आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून एनडीएतून बाहेर पडणारा एमडीएमके हा दुसरा पक्ष ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून एमडीएमकेचे नेते वायको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका सुरु केली आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांना निमंत्रण देण्याच्या मोदींच्या निर्णयावरही वायकोंनी नाराजी व्यक्त केली होती. मोदी तामिळ विरोधी असल्याची टीका करत वायको यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी श्रीलंकेची बाजू घेत असल्याचा आरोपही वायकोंनी केला. नरेंद्र मोदींनी केंद्रात सत्तास्थापन केल्यावर एनडीएतून बाहेर पडणारा एमडीएमके हा दुसरा पक्ष ठरला आहे. यापूर्वी हरियाणा विधानसभा निवडणुकीत हरियाणा जनहित काँग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा फिस्कटली व हरियाणा जनहित काँग्रेसने एनडीएलाच सोडचिठ्ठी दिली. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपामध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. निवडणूक प्रचारात मराठी अस्मितेचे दाखले देणा-या शिवसेनेने सत्तेसाठी पुन्हा भाजपाशीच सूत जुळवून घेतले आहे. तर दुसरीकडे तामिळ अस्मितेवरुन एमडीएमकेने एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे.