हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील काँग्रेस नेते प्रेम शर्मा यांच्या नातवाचा चंदीगडला लागून असलेल्या मोहाली येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या पंजाब पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मोहाली येथे रविवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
सेक्टर 78-79 च्या लाईट पॉईंटवर स्कॉर्पिओ आणि इनोव्हा यांच्यात जोरदार धडक झाली. यादरम्यान इनोव्हा सुमारे 20 फूट उडाली आणि चालकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील तरुणालाही आपला जीव गमवावा लागला. वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात इनोव्हा चालक मोहम्मद अस्लमचा जागीच मृत्यू झाला. स्कॉर्पिओमध्ये प्रवास करणाऱ्या चंदीगड सेक्टर-10 येथील डीएव्ही कॉलेजमधील आर्य शर्मा (21) या विद्यार्थ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्य हा कुल्लू येथील रायसन येथील रहिवासी होता. या अपघातात स्कॉर्पिओ चालक अर्जुन हाही जखमी झाला आहे. आर्यचे आजोबा कुल्लूमध्ये काँग्रेसचे नेते आहेत. आर्य हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
पहाटे स्कॉर्पिओतील तरुण लांद्रा येथील ढाब्यावर जेवण करून चंदीगड सेक्टर 44 ला परतत होते. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं. अपघातातील तिन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे येताच डॉक्टरांनी इनोव्हा चालकाला मृत घोषित केलं. अर्जुनच्या कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. सध्या दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.