राष्ट्रगीत गायनावर बंदी घालणा-या शाळा व्यवस्थापकाला अटक
By Admin | Updated: August 8, 2016 16:04 IST2016-08-08T16:04:06+5:302016-08-08T16:04:06+5:30
राष्ट्रगीत गायनाला परवानगी नाकारणा-या अलहाबादमधील एमए कॉन्वेंट शाळेच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे.

राष्ट्रगीत गायनावर बंदी घालणा-या शाळा व्यवस्थापकाला अटक
ऑनलाइन लोकमत
अलहाबाद, दि. ८ - स्वातंत्र्य दिनी राष्ट्रगीत गायनाला परवानगी नाकारणा-या अलहाबादमधील एमए कॉन्वेंट शाळेच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. बेकायदपणे ही शाळा चालू असल्याने प्रशासनाने ही शाळा बंद करण्याची पावले उचलली आहेत.
अलहाबादमधील बागहारा परिसरातील एमए कॉन्वेंट शाळेत राष्ट्रगीत गायनाला परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी शाळेचा व्यवस्थापक झीया उल हकला याप्रकरणी अटक केली आहे. कुठलीही प्रशासकीय परवानगी नसताना ही शाळा दोन दशके कशी सुरु होती त्याची न्यायदंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपने या शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ७२ तासांच्या आत शाळा बंद केली नाही तर, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू युवा वाहिनीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या शाळेत शिकणा-या ३०० मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी जवळपासच्या दुस-या शाळांमध्ये या मुलांना सामावून घेण्याची शिक्षण खात्याला विनंती करण्यात आली आहे.
राष्ट्रगीत गायनाला परवानगी नाकारली म्हणून मागच्या आठवडयात मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांनी शाळेतून राजीनामा दिला. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. राष्ट्रगीतामधील काही शब्द इस्लामच्या तत्वांविरोधात आहेत म्हणून परवानगी नाकारली असा हक याचे म्हणणे आहे.