लैंगिक अत्याचार प्रकरणी सावंतला पोलीस कोठडी

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30

अकरा दिवस : अल्पवयीन मुलींचे केले होते लैंगिक शोषण

Sawant was arrested in connection with sexual assault case | लैंगिक अत्याचार प्रकरणी सावंतला पोलीस कोठडी

लैंगिक अत्याचार प्रकरणी सावंतला पोलीस कोठडी

रा दिवस : अल्पवयीन मुलींचे केले होते लैंगिक शोषण
पुणे : खाऊ आणि चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चार अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करणार्‍या मारुती हरी सावंत (वय ५८) या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या महासंचालकाला न्यायालयाने अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी सावंतला अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते. दरम्यान पोलिसांनी पिडीत मुलींची वैद्यकीय चाचणी करुन घेतली.
सिंहगड रस्त्यावर असलेल्या हिंगणे परिसरातील त्याच्या सासर्‍याच्या मालकीच्या सदनिकेत त्याने हा घृणास्पद प्रकार केला. दर आठवड्याला दोन दिवस या सदनिकेत तो राहायला येत असे. तो आणि त्याचे कुटुंबीय शिवाजीनगर येथील शासकीय निवासस्थानामध्ये राहण्यास आहेत. पीडित मुलींनी शाळेत समुपदेशन सुरु असताना आपल्यासोबत घडलेल्या गैरप्रकाराची माहिती दिली होती. यामुळे हादरलेल्या शिक्षिकांनी याची कल्पना मुख्याध्यापिकेला दिली. शाळेच्या पदाधिकार्‍यांनी ही माहिती नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्या पत्नीला दिली. त्यांनी सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत काशीद यांच्यासह अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून ते सावंतच्या सदनिकेवर पोचले तेव्हा सावंत लुंगीवरच दारु पीत बसलेला होता. त्याला गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास अटक करण्यात आली होती. सावंत हा मूळचा कोल्हापूरचा असून सेवेमध्ये बढती प्राप्त करीत तो आयएएस झाला आहे. सावंतने हा प्रकार नेमका कधीपासून केला आहे, त्याने आणखी काही मुलींसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केले आहेत काय आदी तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.
सावंतला घातला चपलांचा हार
सावंतला शुक्रवारी दुपारी न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमल्या होत्या. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तामध्येच मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे, अर्चना कांबळे, अस्मिता शिंदे, संगिता तिकोने, अनिता डाखवे, युगंधरा चाकणकर, आशा साने यांनी सावंतला चपलांचा हार घातला. या सर्वजणींना अटक करण्यात आली होती. संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली.
---

Web Title: Sawant was arrested in connection with sexual assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.