नवी दिल्ली- राजस्थानमधल्या गुर्जर समाजानं छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी धोलपूरमध्ये दगडफेक आणि गोळीबार केला आहेत. तसेच तीन गाड्यांची जाळपोळही करण्यात आली आहे. धोलपूरच्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जाम केल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यानंतर जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनीही हवेत गोळीबार केला. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. जमावानं तीन गाड्यांची जाळपोळ केली असून, दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वातावरण तणावपूर्ण झालं आहे.आंदोलकांनी दुपारी धोलपूर शहरात आरक्षणासाठी एक बैठक घेतली. त्यानंतर आंदोलकांनी दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. त्याचदरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. जमावानंही पोलिसांच्या अंगावर दगड भिरकावले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर आंदोलक चंबलकडे पळाले. दगडफेक आणि गोळीबारानंतर मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
गुर्जर आंदोलनाला हिंसक वळण, धोलपूरमध्ये दगडफेक अन् गोळीबार, तीन गाड्या जाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 16:36 IST