‘लोकमत’च्या सामाजिक कार्याने सत्यार्थी प्रभावित
By Admin | Updated: December 24, 2014 02:05 IST2014-12-24T02:05:05+5:302014-12-24T02:05:05+5:30
लोकमत समूहाद्वारे मुले आणि युवक यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या सामाजिक कार्याने प्रभावित झालेले नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी

‘लोकमत’च्या सामाजिक कार्याने सत्यार्थी प्रभावित
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
लोकमत समूहाद्वारे मुले आणि युवक यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या सामाजिक कार्याने प्रभावित झालेले नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी स्वत:हून या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सत्यार्थी यांना नोबेलने सन्मानित करण्यात आल्यानंतर प्रथमच खासदार व लोकमत वृत्तसमूहाच्या संपादकीय मंडळाचे चेअरमन विजय दर्डा यांना भेटले. दर्डा यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्यार्थी यांचे केवळ अभिनंदनच केले नाही, तर बाल मजुरी संपविण्यासाठी त्यांनी चालवलेल्या बचपन बचाओ आंदोलनाची सविस्तर माहिती घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार सत्यार्थी यांच्यासह पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई यांना संयुक्तरीत्या प्रदान करण्यात आला.
कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत खासदार दर्डा यांनी जवळपास दीड तास बातचीत केली. यावेळी सत्यार्थी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ करणाऱ्या पत्नी सुमेधा सत्यार्थी व पुत्र भुवनही उपस्थित होते. भुवन हा पेशाने वकील असला तरी त्याचे काम मुख्यत: बालकामगार व बाल गुलामगिरी याविरुद्धच आहे, असे सत्यार्थी यांनी खासदार दर्डा यांना सांगितले.
खा. दर्डा यांनी सत्यार्थी यांना गांधीवादी गौतम बजाज यांनी विनोबा भावेंवर लिहिलेले पुस्तक व आपली ‘सीधी बात’ व ‘पब्लिक इश्यूज बिफोर पार्लमेंट’ही पुस्तके तसेच लोकमत समाचारचा दिवाळी अंक ‘दीप भव’ आणि औरंगाबाद येथे लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सव्वादोन लाख लोकांद्वारे राष्ट्रगीत ‘जन गण मन...’च्या सामूहिक गायनासाठी मिळालेल्या गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रती भेट दिल्या.
सत्यार्थी म्हणाले, लहानपणीच मी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भ.महावीर, स्वामी विवेकानंद व महर्षी दयानंद यांचे कार्य व विचारांनी प्रभावित झालो. कुमारावस्थेत अस्पृश्यता निर्मूलन चळवळीतही काम केले. आपण सहभागी असलेल्या अस्पृश्यता निर्मूलन मोहिमेपासून ते आर्य समाज, सामाजिक आंदोलन, बालमजुरी आणि बाल गुलामगिरीविरुद्ध सुरूकेलेल्या आपल्या अभियानाबद्दल सत्यार्थी यांनी खासदार दर्डा यांना सविस्तर माहिती दिली. कैलाश शर्मा ते कैलास सत्यार्थी हा स्वत:च्या नावात झालेल्या बदलाचा प्रवासही त्यांनी यावेळी स्पष्ट केला.
जीवनप्रवास
कैलास सत्यार्थी यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या कार्याने प्रभावित खासदार दर्डा यांनी त्यांना लोकमत परिवार बालविकास, सामाजिक आणि मानवता यांच्याशी संबंधित कार्यात कसे योगदान देते याबद्दल सविस्तर माहिती दिली. दर्डा यांनी सांगितले की, ‘संस्काराचे मोती’ नामक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र व गोव्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याचे काम लोकमत वृत्तसमूहाद्वारे केले जात आहे. या भागात अशा प्रकारचे काम करणारा हा एकमेव वृत्तसमूह आहे. याशिवाय लोकमत समूहाने कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयांत आपले विद्यार्थी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. हे प्रतिनिधी संबंधित महाविद्यालयांतील घडामोडींबद्दलचे वेळोवेळी वार्तांकन करत असतात. लोकमत समूहाने या दोन राज्यांत बालविकास मंच व युवा विकास मंच यांची स्थापना केली आहे. याशिवाय कॅम्पस क्लबही चालवला जातो. खासदार दर्डा यांच्या माहितीने प्रभावित झालेले सत्यार्थी यांनी लोकमत परिवाराच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि त्यांचा थेट आढावा घेण्याची इच्छा प्रकट केली. याचवेळी खासदार दर्डा यांनी मुले व युवकांच्या विकासाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या सोयीनुसार सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले.