सातपूर : गुढीपाडव्यानिमित्ताने सातपूर गावात परंपरेप्रमाणे बारा बैलगाड्यांची यात्रा असून, त्याची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा बारा गाड्या ओढण्यार्या गणेशाचा मान अविनाश सुरेश निगळ यांना देण्यात आला आहे. दरवर्षी सातपूर गावात गुढीपाडव्याला अशा प्रकारची यात्रा भरते. यादिवशी बारा गाड्या ओढणार्या गणेशाला नऊवारी वस्त्र परिधान करून सातपूर गावातून भव्य मिरवणूक काढली जाते. त्यानंतर सातपूर औद्योगिक वसाहतीत टेकडीवर असलेल्या आणि ग्रामदेवता संतोषी माता मंदिरात गणेशा पायीच दर्शनाला जातो आणि तेथून परतल्यानंतर त्र्यंबकरोडवर लावण्यात आलेल्या बारा बैलगाड्यांची पूजा केली जाते. या गाड्यांना बैल जंुपलेले नसतात. त्यानंतर अनेक मुले- महिला या गाड्यांवर बसतात आणि गणेशा बारा गाड्या ओढत नेतो. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित असतात. तसेच तेदेखील बारा गाड्यांची पूजा करतात. दोन दिवस चालणार्या या यात्रेमुळे सातपूर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेच्या दुसर्या दिवशी म्हणजे रविवारी सातपूर क्लब हाऊसच्या मैदानावर कुस्त्यांची भव्य दंगल होते. जिल्हाभरातून यंदाही नामांकित मल्लांना पाचारण करण्यात आले आहे. दरवर्षीच्या या यात्रेचा उत्साह वाढत असल्याने बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. यंदाही या यात्रेबाबत सातपूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. एन. मेढे यांनी बैठक घेतली आणि सूचना केल्या. दरम्यान, या पारंपरिक उत्सवासाठी महापालिकेच्या वतीने संरक्षक जाळ्या देण्यात येणार आहेत, तर ग्रामस्थांच्या वतीने परंपरेनुसार यात्रेला उपस्थित राहणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सातपूरला शनिवारी बारा गाड्यांची यात्रा जय्यत तयारी : पंचक्रोशीत उत्सुकता
By admin | Updated: March 21, 2015 00:01 IST