संघ कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश नाकारला- राहुल
By Admin | Updated: December 15, 2015 03:03 IST2015-12-15T03:03:31+5:302015-12-15T03:03:31+5:30
अलीकडेच आसाममधील दौऱ्यात मी बारपेटा येथील मंदिरात प्रवेश करीत असताना रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी मला रोखले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी
संघ कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश नाकारला- राहुल
नवी दिल्ली : अलीकडेच आसाममधील दौऱ्यात मी बारपेटा येथील मंदिरात प्रवेश करीत असताना रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी मला रोखले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपची ही राजकारणाची पद्धत स्वीकारार्ह नसल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे वैष्णव मठाचे प्रमुख (सत्र प्रमुख) वशिष्ठदेव शर्मा यांनी राहुल गांधी यांना कुणीही प्रवेश नाकारला नसल्याचे सांगतानाच हा आरोप दुर्दैवी असल्याचे स्पष्ट केले.
सोमवारी पंजाबमधील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी संसदेबाहेर काँग्रेसने निदर्शने केली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, मला तीन मुद्दे उपस्थित करायचे आहेत. मंगळवारी कोलाम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. हा त्या राज्यांतील जनतेचा अपमान आहे. मी जेव्हा आसाममध्ये गेलो त्यावेळी बारपेटा जिल्ह्णातील एका मंदिरात जात होतो त्यावेळी संघाच्या लोकांनी मला प्रवेश करू दिला नाही. माझ्यासमोर एका महिलेला उभे करण्यात आले आणि मला मंदिरात प्रवेश करता येणार नाही, असे सांगण्यात आले. मला रोखणारे हे लोक कोण आहेत? असा सवालही त्यांनी केला. शुक्रवारी ते बारपेटा येथे गेले होते. ते संध्याकाळी पुन्हा त्या मंदिरात गेले असता संघाचे कार्यकर्ते तेथे नव्हते. भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना बारपेटा येथील मंदिरात प्रवेश नाकारल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी रविवारी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)