सनातन प्रभातची मजल... म्हणे पोलिसांनाच शिक्षा देऊ
By Admin | Updated: September 20, 2015 18:04 IST2015-09-20T18:04:57+5:302015-09-20T18:04:57+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर आता सनातन प्रभातने थेट पोलिसांनाच लक्ष्य केले आहे.

सनातन प्रभातची मजल... म्हणे पोलिसांनाच शिक्षा देऊ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर आता सनातन प्रभातने थेट पोलिसांनाच लक्ष्य केले आहे. समीर गायकवाडला अटक करणा-या पोलिसांची नावे सनातनने नोंद केली आहेत, साधकांचा छळ करणा-या पोलिसांना हिंदू राष्ट्रात कठोर साधनेची शिक्षा करु' असा धमकीवजा इशाराच सनातन प्रभातने दिला आहे.
सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाडला कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सनातनशी संबंधीत सनातन प्रभातमध्ये एक लेख लिहीण्यात आला आहे. या लेखात पानसरे हत्येेच्या तपासावरुन पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले. पोलिसांची कायदाबाह्य कृती आणि सनातन द्रोह सुरु असून पोलिसांनी या अटकेचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे असा दावा या लेखात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनाच कठोर साधनेची 'शिक्षा' दिली जाईल असेही लेखात म्हटले आहे. सनातन प्रभातमधून थेट पोलिसांनाच शिक्षेची धमकी दिल्याने सर्वच स्तरातून या लेखाचा विरोध होत आहे.