संभलमध्ये जुने मंदिर आढळून आल्याचा मुद्दा देशभरात चर्चेत आहे. हनुमानाच्या मंदिराबरोबर परिसरात जुन्या मूर्त्या आणि विहिरीही आढळून आल्या आहेत. या परिसराला बंद करण्यात आले असून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाकडून या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. शुक्रवारी (२० डिसेंबर) पथक परिसरात आले होते.
पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने आढळून आलेल्या कार्तिकेय मंदिराची गुपचूप कार्बन डेटिंग केली. यासाठी विशेष तज्ज्ञांची चार सदस्यीय टीम आली होती. संभलमधील पाच तीर्थस्थळे आणि १९ प्राचीन कुपांचीही पथकाने पाहणी केली.
संभलमध्ये आढळली तीर्थ
संभलमधील भद्रकाश्रम, स्वर्गदीप, चक्रपाणी, प्राचीन तीर्थ स्मशान मंदिरासह पथकाने १९ प्राचीन कुपांचीही स्थिती आणि त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची पाहणी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरातत्व सर्वेक्षण विभागाला प्रशासनाने विनंती केली होती की, ही पाहणी माध्यमांपासून दूर ठेवण्यात यावी. त्यामुळे कुठेही वाच्यता होणार नाही, याची खबरदारी घेत पथक आले आणि पाहणी करून गेले.
संभलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितले?
प्राचीन मंदिर सापडल्याने संभल देशभरात चर्चेत आले आहे. आढळून आलेल्या मंदिराच्या सर्वेक्षणाबद्दल संभलचे जिल्हाधिकारी राजेंद्र पेंसिया यांनी सांगितले की, "मंदिराचे सर्वेक्षण सुरक्षितपणे करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथकाकडून प्राचीन कार्तिकेय मंदिराची कार्बन डेटिंग केली गेली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे ही प्रक्रिया माध्यमांपासून दूर ठेवली गेली.पुरातत्व सर्वेक्षणच्या चार सदस्यीय समितीला प्रशासनाने विनंती केली होती की, मीडिया कव्हरेजपासून हा सर्व्हे दूर ठेवण्यात यावा."
संभलमध्ये हिंसाचारानंतर सुरू असलेल्या शोधमोहिमेवेळी एक मंदिर आढळले होते. १४ डिसेंबर रोजी दीपा राय परिसरात हे मंदिर आढळून आले. १९७८ मधील हे मंदिर असल्याचे आणि ४६ वर्षांपासून बंद असल्याचे समोर आले. १५ डिसेंबर रोजी हे मंदिर हे उघडण्यात आले. त्यानंतर जुनी विहिरही आढळून आली.