Samant Goyal RAW & Arvind Kumar IB chief, appointed on the basis of performance | सामंत गोयल ‘रॉ’चे, तर अरविंद कुमार आयबीचे प्रमुख, कामगिरीच्या आधारे झाल्या नेमणुका
सामंत गोयल ‘रॉ’चे, तर अरविंद कुमार आयबीचे प्रमुख, कामगिरीच्या आधारे झाल्या नेमणुका

नवी दिल्ली - सामंत गोयल व अरविंदकुमार या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची अनुक्रमे रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) व इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तहेर संघटनांच्या प्रमुखपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केली आहे. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याच्या तसेच २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या नियोजनात सामंत गोयल यांचा सहभाग होता.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचे अध्यक्ष या नात्याने नरेंद्र मोदी यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. सामंत गोयल (पंजाब केडर) व अरविंदकुमार (आसाम-मेघालय केडर) हे दोघेही १९८४ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत.

आयबी व रॉचे विद्यमान प्रमुख राजीव जैन व अनिल धस्माना यांची मुदत या महिनाअखेर संपत आहे. त्यानंतर नवे प्रमुख आपल्यापदाची सूत्रे हाती घेतील. जैन व धस्माना यांची नियुक्ती डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आली होती. यंदा लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्याआधी या दोघांनाही सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

बालाकोटवरील हल्ला तसेच त्याआधी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताने पाकिस्तानच्या विरोधात अधिक कठोर भूमिका घेतली आहे हे जगाला स्पष्टपणे जाणवले. त्या यशस्वी हल्ल्यांच्या नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सामंत गोयल हे पाकिस्तानमधील घडामोडींचे जाणकार आहेत. १९९० च्या दशकामध्ये पंजाबात दहशतवादाने थैमान घातले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी या नात्याने उत्तम कामगिरी बजावली होती.

नक्षलवाद्यांना ठेचणारे झाले आयबी प्रमुख

नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोतर्फे बजावण्यात येणाºया कामगिरीत अरविंदकुमार यांचा मोठा सहभाग आहे.
पूर्वी आसाममध्ये सोनीतपूरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांची इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर ते आसाम पोलीसमध्ये पुन्हा परतले नाहीत.
त्याउलट सामंत गोयल यांनी आपल्या कारकीर्दीतील बराच काळ पंजाबमध्ये काम केले. रॉमध्ये त्यांची २००१ साली नियुक्ती झाली. त्यानंतर आजवर ते तेथेच कार्यरत आहेत.
 


Web Title: Samant Goyal RAW & Arvind Kumar IB chief, appointed on the basis of performance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.