पालघरच्या मतदारसंघात सामसूम
By Admin | Updated: September 23, 2014 00:18 IST2014-09-23T00:18:59+5:302014-09-23T00:18:59+5:30
पालघरच्या बहुतांशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असली तरी उमेदवारांचे अर्ज मात्र अद्याप आलेले नाहीत

पालघरच्या मतदारसंघात सामसूम
दीपक मोहिते, वसई
पालघरच्या बहुतांशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असली तरी उमेदवारांचे अर्ज मात्र अद्याप आलेले नाहीत. जागा वाटपावरून राष्ट्रीय पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्यामुळे उमेदवारांची यादी रखडली आहे. प्रचारासाठी कमी अवधी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही आज किंवा उद्या राष्ट्रीय पक्षांना आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करावीच लागणार. २७ तारखेला अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची भाऊगर्दी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेनेही जय्यत तयारी चालवली आहे.
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. युती व आघाडीमधील घटकपक्षामध्ये जागांवरून समझोता होणार की नाही याबाबत कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार २७ तारखेला जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी प्रचाराचा धुमधडाका उडवून दिला आहे. चौकसभा तसेच व्यापारी व उद्योजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे यावर भर देण्यात आला आहे. वसई व नालासोपारा परिसरात अनेक कार्यालये उघडण्यात आली आहेत. दुसरीकडे काँगे्रस व सेनेमध्ये अद्याप शांतता असून निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.
पालघर विधानसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. या जागेवरून महायुती व आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसतानाही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. काँग्रेसतर्फे राजेंद्र गावित तर सेनेतर्फे कृष्णा घोडा यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. या जागेवर मनसेतर्फेही उमेदवार देण्यात येईल अशी चर्चा सर्वत्र होत आहे. मनसेने येथे उमेदवार दिला तरी सेनेला त्याचा फटका बसणार नाही. या मतदारसंघात मनसेचे अस्तित्व नगण्य आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या शंकर नम यांच्यामुळे गावित यांचा विजयाचा मार्ग सुलभ झाला होता. आता शंकर नम सेनेवासी झाले असून डहाणू मतदारसंघातून ते सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये डहाणू विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व मिळवणाऱ्या मार्क्स. कम्यु. पक्षाला यंदा बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याच पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. तर दुसरीकडे परुळेकर विचारमंच या सामाजिक संघटनेनेही ५ जागी आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. मार्क्स. कम्यु. पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीचा फायदा सेनेला होण्याची दाट शक्यता आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी निवडुन आलेले बहुजन विकास आघाडीचे विलास तरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.