धाडसाला सलाम...जवानांच्या मोहीमेमुळे लडाखमधील पूरसंकट टळले
By Admin | Updated: April 2, 2015 11:03 IST2015-04-02T11:01:38+5:302015-04-02T11:03:22+5:30
देशाच्या संरक्षणासोबतच बचाव कार्यातही महत्त्वाची भूमिका निभावणा-या भारतीय जवानांच्या धाडसी मोहीमेमुळे लडाखमधील पुर संकट टळले आहे.

धाडसाला सलाम...जवानांच्या मोहीमेमुळे लडाखमधील पूरसंकट टळले
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २ - देशाच्या संरक्षणासोबतच बचाव कार्यातही महत्त्वाची भूमिका निभावणा-या भारतीय जवानांच्या धाडसी मोहीमेमुळे लडाखमधील पुर संकट टळले आहे. सैन्याच्या जवानांनी समुद्र सपाटीपासून १३ हजार फूट उंचावर असलेल्या लडाखमधील झंस्कार नदीतील अडथळा स्फोट घडवून दूर केला आहे. सैन्य, हवाई दल व आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी राबवलेल्या या धाडसी मोहीमेचे भारतासोबतच पाकिस्तानमधील वेबसाईट्सवरही कौतुक होत आहे.
जम्मू काश्मीरमधील लेह लडाख येथे काही महिन्यांपूर्वी झंस्कार नदीच्या खो-यात भूस्खलन झाले होते. भूस्खलनामुळे झंस्कार नदीचा मार्ग थांबला व झंस्कार खो-यात तब्बल १५ किलोमीटर परिसरात पाणी साठले. थंडीच्या दिवसांत हे पाणी गोठून बर्फाचा तलाव तयार झाला. हा तलाव कधीही फुटण्याची शक्यता होती व यामुळे लडाखमधील नदी किनारच्या गावांना धोका निर्माण झाला असता. या गावांमध्ये पुर येऊन जीवित व वित्तहानी झाली असती. हा संभाव्य धोका ओळखून जम्मू काश्मीर सरकारने या घटनेची माहिती केंद्र सरकारला दिली. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण, सैन्य व हवाई दलाची उच्चस्तरीय बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याची योजना आखली. हवाई दलाच्या माध्यमातून सैन्याच्या जवानांनी स्फोट घडवून हा तलाव फोडण्याची मोहीम हाती घेतली.
हवाई दलांच्या विमानांच्या तब्बल ३०० हून अधिक तास उड्डाण करत ५०० फे-या मारल्या. सैन्याच्या जवानांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झंस्कार नदीच्या मार्गात आलेला राडा रोडा दूर केला. झंस्कार नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. यानंतर १७५ किलोहून अधिक स्फोटकांचा वापर करत हा तलाव फोडण्यात आला. अखेरीस झंस्कार नदीचा मार्ग मोकळा झाला आहे. जोरदार वारे, प्रतिकूल परिस्थितीत सैन्याच्या जवानांनी राबवलेली ही मोहीम कौतुकाचा विषय ठरली आहे.