सलाहुदीनची भारतात परतण्याची इच्छा
By Admin | Updated: July 6, 2015 01:06 IST2015-07-05T23:14:38+5:302015-07-06T01:06:48+5:30
बंदी असणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नेता सईद सलाहुद्दीन याला अजूनही भारतात परतण्याची इच्छा आहे, असे रॉ संघटनेचे माजी प्रमुख ए.एस. दुलात यांनी म्हटले आहे.

सलाहुदीनची भारतात परतण्याची इच्छा
नवी दिल्ली : बंदी असणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नेता सईद सलाहुद्दीन याला अजूनही भारतात परतण्याची इच्छा आहे, असे रॉ संघटनेचे माजी प्रमुख ए.एस. दुलात यांनी म्हटले आहे. सईद सलाहुद्दीन याच्या परतण्याचा कार्यक्रम ठरविण्यात सरकारने फार वेळ घेतला, असे दुलात यांना वाटते.
२००१ पर्यंत सईद भारतात परतण्यास तयार होता. ही त्याची इच्छा मी अनेक वेळा सांगितली होती. माझ्यानंतरचे रॉचे प्रमुख विक्रम सूद यांना या प्रस्तावात रस नसावा. पंतप्रधान कार्यालयातून मी काश्मीर प्रश्न हाताळत असल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांनीही यात पडण्याची गरज नाही, असा निर्णय घेतला असावा, असे दुलात यांनी ‘काश्मीर : द वाजपेयी इअर्स’ या पुस्तकात म्हटले आहे.
रॉतून २००० साली निवृत्त झाल्यानंतर दुलात वाजपेयी सरकारच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे काश्मीरवरील विशेष सल्लागार होते. सलाहुद्दीनने माजी मुख्यमंत्री मीर कासीम यांच्याशी १९९० च्या मध्यात संपर्क साधला होता.
मला विसरू नका, असे त्याने कासीम यांना सांगितले होते. तुम्ही वाटाघाटी करीत असाल तर मला विसरू नका, असे सलाहुद्दीन म्हणाला होता, असे दुलात यांनी या पुस्तकात म्हटले आहे. अजूनही मला संदेश मिळतात. २० वर्षांनंतरही आपले काही लोक पाकिस्तानात अडकले आहेत, असे दुलात यांचे म्हणणे आहे.
--------------
> दुलात यांनी हा प्रसंग वर्णन करताना असे म्हटले आहे की, तत्कालीन श्रीनगरमधील आय.बी. प्रमुख के.एम. सिंग यांना सलाहुद्दीनचा फोन आला होता. त्याच्या मुलाला भारतात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता. ते काम झाले आणि सलाहुद्दीनने आभार मानण्यासाठी पुन्हा सिंग यांना फोन केला.
> त्याच्या या बोलण्यातून योग्य तो बोध घ्यायला हवा होता; पण तसे झाले नाही. अगदी कमी वेळेत घ्यायच्या या निर्णयसाठी वेळ वाया घालवला गेला. निर्णय झालाच नाही.