इंग्लंडला जाण्याचं सलमानचं स्वप्न भंगलं - सुप्रीम कोर्टाचा हिसका
By Admin | Updated: November 5, 2014 15:17 IST2014-11-05T15:08:22+5:302014-11-05T15:17:17+5:30
तुला इंग्लंडला व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे कोर्टाचं काम नसल्याचं फटकारत सुप्रीम कोर्टानं न्यायालयासमोर सगळे समान असतात याचा वस्तुपाठ दाखवला आहे.

इंग्लंडला जाण्याचं सलमानचं स्वप्न भंगलं - सुप्रीम कोर्टाचा हिसका
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - सलमान खानला इंग्लंडला जाण्याचा व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे कोर्टाचं काम नसल्याचं फटकारत सुप्रीम कोर्टानं न्यायालयासमोर सगळे समान असतात याचा वस्तुपाठ दाखवला आहे. काळविट शिकारप्रकरणात सलमान खानला दोषी ठरवणारा सत्र न्यायालयाचा निकाल हायकोर्टाने रद्दबातल केला होता. ज्याच्या विरोधात राजस्थान सरकार सुप्रीम कोर्टात गेले आहे. या प्रकरणाचा आदेश सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. दरम्यान, आपला दोषी ठरवणारा निकाल रद्दबातल न झाल्याने मला इंग्लंडला जाता येत नसल्याची व प्रवासाचा हक्क बजावता येत नसल्याची बाब सलमानने न्यायालयाच्या निदर्शनास आणली होती. त्यावर अभिप्राय देताना, न्यायाधीश म्हणाले की उद्या राजकारणी कोर्टात येतील आणि आम्हाला दोषी धरल्याचा फटका बसत असल्याने आमचा दोषी ठरवणारा निकाल रद्द करावा अशी मागणी करतील. सलमानच्या वकिलांना न्यायाधीशांनी आम्ही असं करू शकतो का असा प्रतिप्रश्न केला आणि हे काम आमचं नसल्याचंस्पष्ट केलं.
सोळा वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये सिनेमाच्या शुटिंगसाठी गेलेल्या सलमानवर दुर्मिळ व संरक्षित अशा काळविटाची शिकार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी २००७मध्ये त्याला न्यायालयाने दोषी घोषित केले होते. गेल्या वर्षी राजस्थान उच्च न्यायालयाने हा निकाल रद्द केला व त्याचा इंग्लंडला शुटिंगसाठी जाण्याचा मार्ग सुकर केला. त्याविरोधात राजस्थान सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आहे. इंग्लंडच्या कायद्यानुसार एखादी व्यक्ती कुठल्याही कोर्टात दोषी आढळली असेल तर तिला व्हिसा देण्यात येत नाही. सलमानला या प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. याशिवाय मुंबईमध्ये २००२ साली दारूच्या नशेत पदपथावर झोपलेल्यांना चिरडल्याचा आरोपही त्याच्यावर आहे व तो खटला सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे बड्यांना जनमानसात जरी विशेष वागणूक मिळत असली तरी न्यायदेवतेसमोर सगळे समान असल्याचे दिसून आले आहे.