‘सलमान वाचवण्याची विनवणी करीत होता’
By Admin | Updated: May 21, 2014 08:55 IST2014-05-21T03:45:35+5:302014-05-21T08:55:12+5:30
पडद्यावर एकाच वेळी अनेक गुंडांशी दोनहात करणारा अभिनेता सलमान खान वांद्रे येथे अपघात झाल्यानंतर हातात काठ्या व दगड घेतलेला जमाव बघून मात्र मला वाचवा

‘सलमान वाचवण्याची विनवणी करीत होता’
मुंबई : पडद्यावर एकाच वेळी अनेक गुंडांशी दोनहात करणारा अभिनेता सलमान खान वांद्रे येथे अपघात झाल्यानंतर हातात काठ्या व दगड घेतलेला जमाव बघून मात्र मला वाचवा, अशी विनवणी करीत होता़ सलमानचे शेजारी फ्रान्सिस फर्नांडीस यांच्या साक्षीतून मंगळवारी हे घटनास्थळाचे वास्तव सत्र न्यायालयाच्या समोर आले़ महत्त्वाचे म्हणजे सलमानने त्या वेळी मद्यपान केले नसल्याचा दावाही फ्रान्सिस यांनी केला़ याने सलमानला मोठा दिलासा मिळाला आहे़ कारण घटनेच्या दिवशी सलमानने मद्यापान केले असल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे़ सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशमुख यांच्यासमोर ६३ वर्षीय फ्रान्सिस यांची साक्ष नोंदवण्यात आली़ फ्रान्सिस हे अपघात झालेल्या विभागातच राहतात़ ते म्हणाले, मी सलमानला तो लहान असल्यापासून ओळखतो़ अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला़ या आवाजाने मी तत्काळ घटनास्थळी पोहोचलो़ त्या वेळी सलमानने मला पाहिले व म्हणाला, कंमाडर मुझे बचाईये़.. तेव्हा सलमान जमावाच्या विळख्यात होता़ अपघाताने संतप्त झालेल्या जमावाच्या हातात काठ्या व दगड होते़ याने सलमानच्या जीवाला धोका झाला असता़ त्यामुळे मी सलमानला तात्काळ तेथून घेऊन गेलो़ माझ्या पत्नीने सलमानला गाडीत बसण्यास सांगितले़ त्या क्षणाला मी सलमानच्या अगदी जवळ गेलो होतो़ त्यावेळी सलमानने मद्यापन केले असल्याचे जाणवले नाही, असेही फ्रान्सिस यांनी सांगितले़ त्याची नोंद करून न्यायालयाने ही सुनावणी २३ जूनपर्यंत तहकूब केली़ मंगळवारीही सलमान न्यायालयात हजर होता़ या खटल्यात आतापर्यंत सातजणांची साक्ष नोंदवली गेली आहे़ तब्बल १२ वर्षांपूर्वी सलमानने पदपथावरील चौघांना चिरडले होते. (प्रतिनिधी)