नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचे जवान एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यातच एक सीक्रेट रिपोर्ट समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याचं प्लॅनिंग लश्कर ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरीने केले होते. या हल्ल्याबाबत फेब्रुवारीत बैठक झाली होती. सैफुल्लाहने ५ दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी तयार केले होते. त्यानंतर मार्चमध्ये हे दहशतवादी भेटले होते. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन जगासमोर उघड झाले आहे.
पहलगाम हल्ल्याचं प्लॅनिंग फेब्रुवारीपासून सुरू झाले होते. लश्कर ए तोयबाचा सैफुल्लाहच्या आदेशावर हा संपूर्ण कट रचला गेला. दहशतवाद्यांची पहिली बैठक फेब्रुवारीत झाली होती. त्यानंतर मार्चमध्ये मीरपूर इथं दहशतवाद्यांची दुसरी बैठक झाली. त्यात सर्व दहशतवादी सहभागी होते. या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा आराखडा बनला. पाकिस्तानी सैन्यानेही दहशतवाद्यांची मदत केली. सैफुल्लाहने पाच दहशतवाद्यांना सूचना दिल्या. त्यानंतर मीरपूर येथे पहलगाम हल्ल्याचं षडयंत्र शिजले. सैफुल्लाहसोबत बैठकीत अबू मूसा, इदरीस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्लाह खालिद सहभागी होते. सैफुल्लाहला आयएसआयकडून ऑर्डर मिळत होत्या. एबीपी न्यूजनं सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
लश्कर ए तोयबाचा सैफुल्लाह पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पमध्ये पोहचला होता. बहावलपूर येथील हेडक्वार्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कर्नलने सैफुल्लाहचं स्वागत केले. त्याचे फोटोही समोर आलेत. पाकव्याप्त काश्मीरात एक कार्यक्रम झाला होता. १८ एप्रिलला रावलकोटमध्येही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचे व्हिडिओ समोर आलेत. सैफुल्लाहसोबत ५ दहशतवादी दिसत आहेत ज्यांनी चिथावणी देणारी भाषणे केली.
सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत दोन स्थानिक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी आज उद्ध्वस्त केली. गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं, ते स्फोट घडवून उडवण्यात आलं आहे. तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.