बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वर्षांपूर्वी एका महिलेने प्रेमविवाह केला होता. मात्र आता १२ वर्षांनंतर ती महिला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. हा प्रकार महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्याने पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सहरसा येथील बैजनाथपूर गावचं आहे. रहुआ तुलसीयाही गावातील तरुणीवर १२ वर्षांपूर्वी एका तरुणाचं प्रेम होतं. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण त्यांच्या घरचे तयार नव्हते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांना तीन मुलं झाली. त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं.
याचदरम्यान गावात राहणाऱ्या तरुणावर महिलेचा जीव जडला. आंतरजातीय विवाहानंतर या तरुणाने महिलेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली होती. येथून या तरुणाची महिलेशी जवळीक वाढली आणि हळूहळू प्रेमप्रकरण सुरू झालं. १६ डिसेंबरच्या रात्री तरुण महिलेच्या घरी पोहोचला, त्यादरम्यान महिलेचा पती अचानक घरात आला आणि त्याने पत्नीला बॉयफ्रेंडसह रंगेहात पकडलं.
महिलेने आपलं प्रेमप्रकरण सर्वांसमोर कबूल केलं आणि बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर महिलेच्या पतीने महिलेचे तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. दुसऱ्यांदा प्रेमविवाह केल्यानंतर महिलेने तिची तीन मुलांना आपल्यासोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तिच्या पहिल्या पतीलाही मुलांना सोबत ठेवायचं होतं.
पहिला नवरा आता मुलांसोबत आहे. ही महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहू लागली आहे. गावकऱ्यांसमोर झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणी महिलेच्या पहिल्या पतीने सांगितले की, तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो, मात्र तिचा आनंद आता दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे.