सईद १ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?
By Admin | Updated: February 24, 2015 23:27 IST2015-02-24T23:27:41+5:302015-02-24T23:27:41+5:30
जम्मू-काश्मिरातील पीडीपी-भाजपच्या युती सरकारची औपचारिक घोषणा मंगळवारी करण्यात आली. पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहंमद

सईद १ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील पीडीपी-भाजपच्या युती सरकारची औपचारिक घोषणा मंगळवारी करण्यात आली. पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहंमद सईद १ मार्च रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. कलम ३७० आणि सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्यासह (अफस्पा) सर्व वादग्रस्त मुद्यांवरील मतभेद निकाली निघाले असून युती सरकारच्या स्थापनेला अंतिम आकार दिला जात आहे.
सईद बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. गुरुवारी किमान समान कार्यक्रमांची(सीएमपी) घोषणा होईल. सईद यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १ मार्चला होऊ शकतो. शुभदिन मानून ही तिथी निवडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पाऊण तासांच्या बैठकीनंतर या दोघांनी युती सरकारच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली.
वेगवेगळ्या मुद्यांवर अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा पार पडली असून किमान समान कार्यक्रमांवर जवळजवळ सहमती झाली आहे. लवकरच जम्मू-काश्मीरच्या जनतेला लोकप्रिय सरकार मिळेल, असे शहा म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)