साध्वींचे विधान निषेधार्हच, पण संसदेचे कामकाज चालू द्या - मोदी
By Admin | Updated: December 4, 2014 12:10 IST2014-12-04T12:10:01+5:302014-12-04T12:10:01+5:30
साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिस-या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्याने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले आहे.

साध्वींचे विधान निषेधार्हच, पण संसदेचे कामकाज चालू द्या - मोदी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिस-या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्याने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले आहे. आम्ही अशा वादग्रस्त विधानांचा निषेधच करतो, मात्र साध्वींनी माफी मागितली असून विरोधकांनाही त्यांना माफ करुन राष्ट्रहितासाठी संसदेचे कामकाज चालू द्यावे अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
साध्वी निरंजन ज्योती यांच्या विधानावरुन विरोधक आक्रमक झाले असून साध्वी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. गुरुवारी राज्यसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी साध्वींच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. मोदी म्हणाले, साध्वी निरंजन ज्योती नवीन आहेत, त्यांची पार्श्वभूमीही सर्वांना माहित आहे. त्यांचे विधान निषेधार्ह असून असे विधान करणे टाळायला पाहिजे. राज्यसभेत अनेक ज्येष्ठ नेते असून त्यांनी साध्वींना माफ करुन संसदेचे कामकाज चालू द्यावे असे मोदींनी सांगितले. मोदींनी उत्तरावरही विरोधकांचे समाधान झाले नाही व राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब करावे लागले. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून सभागृहात सुरु असलेला गोंधळ योग्य नाही अशा शब्दात राज्यसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांना सुनावले.