साध्वींना हाकला !
By Admin | Updated: December 4, 2014 03:36 IST2014-12-04T03:36:40+5:302014-12-04T03:36:40+5:30
संसदेच्या दोन्ही सभागृहांत एकजूट झालेल्या विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला़ साध्वींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आणि पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली़

साध्वींना हाकला !
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री साध्वी निरांजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुधवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत एकजूट झालेल्या विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला़ साध्वींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आणि पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली़
सरकारने मात्र साध्वींनी काल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा मुद्दा संपल्याचे सांगून विरोधकांची ही मागणी धुडकावून लावली़ या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांतील कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले़ तशात राष्ट्रवादी काँग्रेसनेही तटस्थतेचा त्याग करीत विरोधकांना बळ दिल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
> शरद पवार नव्या आघाडीच्या शोधात
आंदोलनात भाग
आतापर्यंत या मुद्द्यावरून अलिप्तता बाळगणारा राष्ट्रवादीही आता राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. आम्ही साध्वीच्या राजीनाम्याची मागणी केली असून, आम्ही साध्वीविरुद्धच्या आंदोलनाचा भाग आहोत, असे राष्ट्रवादीचे खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी स्पष्टपणे सांगितले.
> राष्ट्रवादीने पवित्रा बदलण्याची कारणे
आता शिवसेना महाराष्ट्रात भाजपा सरकारमध्ये सामील होणार असल्याकारणाने राष्ट्रवादीने नवी भूमिका शोधण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेसला सोबत घेऊन नवी संयुक्त आघाडी स्थापण्याचा प्रयत्न करेल, असे सूत्रांनी म्हटले आहे. साध्वी मुद्द्याने या सर्व पक्षांना एकत्र येण्याची संधी दिली आहे.
> महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना यांनी हातमिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादी आता समविचारी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणार असून, शरद पवार हे या एकीकरणाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी समाजवादी पार्टी, संयुक्त जनता दल, राजद, भारालोद आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांच्या नेत्यांनी नव्या आघाडीचा विचार करण्यासाठी गुरुवारी दुपारी एक बैठक बोलावलेली आहे.