सचिनने सावरला कोसळणा-या शाळेचा डोलारा
By Admin | Updated: June 14, 2016 17:14 IST2016-06-14T15:13:51+5:302016-06-14T17:14:13+5:30
समाजसेवेमध्ये अग्रेसर असणा-या सचिन तेंडुलकरने आता पश्चिमबंगालमधील एका दुर्लक्षित शाळेच्या पुनर्बांधणीसाठी आपला खासदार निधी दिला आहे.

सचिनने सावरला कोसळणा-या शाळेचा डोलारा
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १४- क्रिकेटच्या मैदानावरुन निवृत्ती घेतल्यानंतर खासदार म्हणून काम करताना समाजसेवेमध्ये अग्रेसर असणा-या सचिन तेंडुलकरने आता पश्चिमबंगालमधील एका दुर्लक्षित शाळेच्या पुनर्बांधणीसाठी आपला खासदार निधी दिला आहे. यापूर्वी आदर्श ग्राम योजनेतंर्गत आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा गाव सचिनने दत्तक घेतले आहे.
मुख्याध्यापकांच्या विनंतीवरुन सचिनने गोबिंदपूर माकरमपूर स्वर्णमोयी सासमल शिक्षा निकेतन शाळेच्या दुरुस्तीसाठी ७६,२१,०५० इतकी रक्कम खासदार निधीतून दिली आहे. पश्चिम बंगालच्या मिदानपोर जिल्ह्यात ही शाळा आहे. सचिनने ७५ टक्के निधी दिला असून, तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली आहे.
सचिनकडून मदत मिळणे हे चमत्कारपेक्षा कमी नाही असे मुख्याध्यापक उत्तम कुमार मोहांती सांगतात. ही शाळा कोसळण्याच्या अवस्थेत होती. स्थानिक आमदार, खासदारांचे त्यांनी मदतीसाठी अनेकदा उंबरे झिजवले पण काही उपयोग झाला नाही. दहावर्षाच्या संघर्षानंतर एकदिवस त्यांना सचिनला मदतीसाठी पत्र लिहीण्याची कल्पना सुचली.
सचिनच्या खासदारकीला त्यावेळी एकवर्ष झाले होते आणि संसदेतील अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर टीका सुरु होती. मोहांती यांनी सचिनचा ई-मेल अॅड्रेस मिळवला व १३ मार्च २०१३ रोजी सचिनला आर्थिक मदतीसाठी पत्र पाठवले. यानंतर वर्षभराचा कालावधी लोटला. सचिनला पत्र लिहील्याचे मोहांती विसरुन गेले होते.
त्यानंतर सात ऑगस्ट २०१४ रोजी सचिनकडून पत्राला उत्तर मिळाले. सचिनने शाळेच्या पूर्नबांधणीसाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाला जागत सचिनने या शाळेला उभे करण्यासाठी पूर्ण मदत केली.