सचिन तेंडुलकर?.. मी नाही ओळखत - मारिया शारापोव्हा
By Admin | Updated: July 2, 2014 18:52 IST2014-07-02T16:59:45+5:302014-07-02T18:52:42+5:30
टेनिस स्टार असलेल्या आणि नुकतीच फ्रेंच ओपन विजेती ठरलेल्या मारिया शारापोव्हाला सचिन तेंडुलकर कोण आहे हे माहित नाही.

सचिन तेंडुलकर?.. मी नाही ओळखत - मारिया शारापोव्हा
ऑनलाइन टीम
पॅरिस, दि. २ - क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात करोडो चाहते आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सचिनची लोकांवरील जादू कायम आहे. परंतु टेनिस स्टार असलेल्या आणि नुकतीच फ्रेंच ओपन विजेती ठरलेल्या मारिया शारापोव्हाला सचिन तेंडुलकर कोण आहे हे माहित नाही.
सचिनने शनिवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेला हजेरी लावली होती. त्याच्यासोबत रॉयल बॉक्समध्ये इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एन्ड्रयू स्ट्रॉस, फुटबॉल खेळाडू डेव्हिड बॅकहॅम आणि गोल्फपटू इयान पॉल्टर हेही सामना पाहत होते. सामन्यानंतर मारियाला प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता तिने आपण बेकहॅमला ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला सचिन तेंडुलकरबद्दल आठवण करून दिली असता, तिने कोण सचिन तेंडुलकर असा प्रश्न विचारला. मी बेकहॅमला ओळखते मात्र मी सचिन तेंडुलकरला खरेच ओळखत नाही असे तिने सांगताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, सचिनला क्रिकेटबरोबरच टेनिस खेळायला आणि पाहायला आवडते. सचिनने अनेकदा विम्बलडनमध्ये जाऊन कित्येक सामने पाहिले असून टेनिसमध्ये १७ वेळा ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावणारा रॉजर फेडरर हा सचिनचा चांगला मित्र आहे.