आरएसएसने ‘घर वापसी’ गुंडाळली
By Admin | Updated: January 3, 2015 01:39 IST2015-01-03T01:39:49+5:302015-01-03T01:39:49+5:30
इतर धर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश देण्याची ‘घर वापसी’ मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सध्यातरी हळूवारपणे बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे.

आरएसएसने ‘घर वापसी’ गुंडाळली
नवी दिल्ली : इतर धर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश देण्याची ‘घर वापसी’ मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सध्यातरी हळूवारपणे बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे.
उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला जात असल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात विरोध करीत संसदेचे कामकाज बंद पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आक्रमक हिंदू नेत्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे सरकारची विकसनशील प्रतिमा मलीन होत असल्याची चिंता मोदी यांनी व्यक्त करताच संघाच्या दिग्गजांच्या सूचनेवरून कुणालाही थांगपत्ता न लागू देता ही मोहीम स्थगित झाल्याचे बोलले जाते.
१९९६ पासून धर्मजागरण मोहीम राबविणारे ५५ वर्षांचे ज्येष्ठ संघ प्रचारक राजेश्वरसिंग हे भक्कमपणे हिंदू धर्म पुनर्प्रवेश अर्थात ‘घर वापसी’ मोहिमचे नेतृत्व करीत होते. पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या भागात ते समन्वयक म्हणून काम पाहात होते. त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली.
मोदी सरकार एकीकडे विकास कामांचा अजेंडा पुढे करीत असताना प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांच्या अट्टाहासापोटी सरकारला बॅकफुटवर यावे लागत असल्याबद्दल मोदी यांनी संघाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आल्याचे आरएसएसच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे राजेश्वरसिंग यांनीही सध्यातरी कुठल्याही संघ कार्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर सातत्याने दबाव येत आहे. त्यामुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्याने मी घरी विश्रांती घेणार आहे. माझ्यामते मी काही वाईट काम केलेले नाही. आरएसएसच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांनी आधी मला पाठिंबा दर्शविला होता. पण या घटनेतून संघ नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम नसतो, असे दिसून आले आहे.’
च्सरकारची विकसनशील प्रतिमा मलीन होत असल्याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिग्गजांच्या सूचनेवरून कुणालाही थांगपत्ता न लागू देता ही मोहीम स्थगित झाल्याचे बोलले जात आहे.
संघातील दिग्गज पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी आधी माझ्या मोहिमेला बळ दिले. पण संघ प्रत्येकवेळी भूमिकेवर ठाम राहात नाही. आता संघ नेत्यांना माझी गरज नाही. पुढे कधीतरी माझी गरज त्यांना पडेलच.
- राजेश्वरसिंग, ज्येष्ठ संघ प्रचारक