बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. यात रोजगार, शेती विकास आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. भाजप, जेडीयू आणि इतर पाच पक्षांच्या आघाडीने एकत्रितपणे हे संकल्पपत्र सादर केले असून, पुन्हा सत्ता मिळाल्या, राज्यातील शेतकरी, युवक आणि गरीब वर्गासाठी मोठे आणि महत्वाचे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांनी शुक्रवारी पाटणा येथे एनडीएचे संकल्पपत्र जारी केले. यात, बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार आल्यास शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेव्यतिरिक्त, राज्य सरकारकडूनही 3000 रुपयांचा अतिरिक्त सन्माननिधी दिला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना एकूण 9000 रुपये वार्षिक मदत मिळेल. तसेच तांदूळ, गहू, मका आणि डाळी यांसारख्या सर्व प्रमुख पिकांची खरेदी पंचायत स्तरावर किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) केली जाईल. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाटी शेती क्षेत्राशीसंबंधित पायाभूत सुविधांवर एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
एनडीएने पुढील पाच वर्षांत एक कोटी लोकांना नोकरी आणि रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्येक जिल्ह्यात उद्योगधंदे उभारले जातील, तसेच मागास समाजातील विविध व्यावसायिक गटांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. असे आश्वासनही या संकल्पपत्रात देण्यात आले आहे.
याशिवाय, पायाभूत सुविधांसाठी सात नवे एक्सप्रेसवे, 3600 किलोमीटर रेल्वेमार्गाचे आधुनिकीकरण, चार शहरांत मेट्रो सेवा आणि दहा नव्या विमानतळांची उभारणी करण्यात येईल. तसेच दरभंगा आणि पूर्णिया येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात येतील. याच बरोबर, राजधानी पटण्याजवळ न्यू पाटणा ग्रीनफिल्ड शहर उभारले जाईल, असेही एनडीएने म्हटले आहे.
एनडीएने आपल्या संकल्पपत्रात, सीतामढीत पुनौरा धामला ‘सीतापुरम’ ही जागतिक दर्जाची धार्मिक नगरी बनवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच, गरीब विद्यार्थ्यांना केजीपासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण, सरकारी शाळांमध्ये मिड-डे मीलसह पौष्टिक नाश्ता, शाळांमध्ये आधुनिक कौशल्य प्रयोगशाळा तयार केल्या जातील, आदी आश्वासने एनडीएने दिली आहेत.
Web Summary : NDA's Bihar manifesto focuses on jobs, agriculture, and infrastructure. Promises include ₹3000 annual aid to farmers, one crore jobs, industry in every district, and infrastructure development like expressways and airports. A new city near Patna and upgrades to religious sites are also planned.
Web Summary : NDA के बिहार घोषणापत्र में रोजगार, कृषि और बुनियादी ढांचे पर ध्यान केंद्रित किया गया है। किसानों को ₹3000 की वार्षिक सहायता, एक करोड़ नौकरियां, हर जिले में उद्योग और एक्सप्रेसवे और हवाई अड्डों जैसे बुनियादी ढांचे के विकास का वादा शामिल है। पटना के पास एक नया शहर और धार्मिक स्थलों का उन्नयन भी योजना में है।