काश्मीरमध्ये तीन महिन्यांत १० हजार कोटी रुपयांचा फटका; व्यापारी संघटनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 02:30 AM2019-10-28T02:30:11+5:302019-10-28T06:23:35+5:30

कलम ३७0 रद्द केल्यानंतर लावलेल्या विविध निर्बंधांचा परिणाम

Rs 3,000 crore hit in Kashmir in three months; Trade union claim | काश्मीरमध्ये तीन महिन्यांत १० हजार कोटी रुपयांचा फटका; व्यापारी संघटनेचा दावा

काश्मीरमध्ये तीन महिन्यांत १० हजार कोटी रुपयांचा फटका; व्यापारी संघटनेचा दावा

googlenewsNext

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे मागील तीन महिन्यांत काश्मीर खोऱ्यात व्यावसायिक समुदायांना १०,००० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. एका व्यापारी संघटनेने हा दावा केला आहे.

केंद्र सरकारने पाच आॅगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले होते. त्यानंतर सुरक्षेचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. रविवारी या निर्बंधांना ८४ दिवस झाले आहेत. या निर्बंधांमुळे मुख्य बाजारपेठा अधिकांश वेळ बंदच राहिल्या व सार्वजनिक परिवहनही रस्त्यांपासून दूर राहिली.

काश्मीर वाणिज्य व उद्योग मंडळ, या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेख आशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल चौक भागातील काही दुकाने सकाळच्या वेळी व सायंकाळी अंधारात काही काळ उघडली जातात. मात्र, मुख्य बाजारपेठ बंदच आहे. प्रत्यक्ष किती नुकसान झाले, याचा अंदाज लावणे अशक्य आहे. कारण येथील स्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. या काळात व्यावसायिक समुदायाला मोठा फटका बसला आहे व यातून वर येणे अवघड दिसत आहे.

शेख आशिक म्हणाले की, काश्मीरमध्ये आतापर्यंत बाजारपेठेचे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. तीन महिने झाले तरी स्थिती सामान्य होत नाही. काही ठिकाणी बाजार आठवड्यातून काही काळ उघडण्यास सुरुवात झालेली आहे; परंतु कामकाज मंदावलेलेच आहे.

व्यवसायात मोठे नुकसान होण्याचे प्रमुख कारण म्हणजे इंटरनेट सेवा बंद असणे हेच आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, कोणताही व्यवसाय सुरू असण्यासाठी इंटरनेट सेवा सुरू असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय काम करणे अशक्य आहे. याबाबत आम्ही राज्यपाल, प्रशासनाला अवगत केलेले आहे. त्यांना सांगितले की, काश्मीरमध्ये व्यवसायांना फटका बसला आहे. आगामी काळात याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

शेख आशिक यांनी सांगितले की, हस्तशिल्प क्षेत्राचे उदाहरण घेतले तर संबंधित लोकांना जुलै-आॅगस्ट महिन्यात कामाच्या आॅर्डर मिळतात. त्या ख्रिसमस सण म्हणजेच नव्या वर्षाच्या प्रारंभी पूर्ण केल्या जातात. आता या आॅर्डर हे कारागीर कधी पूर्ण करतील? इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तरच त्यांना काम मिळेल. याच्या अभावामुळे ५० हजारांच्या आसपास कारागिरांचा रोजगार गेला आहे.

Web Title: Rs 3,000 crore hit in Kashmir in three months; Trade union claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.