आयएसआयने भारतात पाठवल्या २,५०० कोटींच्या बनावट नोटा
By Admin | Updated: September 20, 2014 14:20 IST2014-09-20T14:18:42+5:302014-09-20T14:20:31+5:30
दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना 'आयएसआय'ने गेल्या चार वर्षांत २,५०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा भारतात पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

आयएसआयने भारतात पाठवल्या २,५०० कोटींच्या बनावट नोटा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना 'आयएसआय'ने गेल्या चार वर्षांत २,५०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा भारतात पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आत्तापर्यंत त्यापैकी अवघे ४५५ कोटी रुपयेच जप्त करण्यात आले असून, ५५ कोटी रुपये परदेशांतून हस्तगत करण्यात आले असून भारतीय गुप्तचर यंत्रणांसाठी ही चिंतेची बाब आहे.
पाकिस्तानात आयएसआयच्या देखरेखीखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्कृष्ट प्रतीच्या बनावट नोटा बनवल्या जात असून त्याची पेपर क्वॉलिटी, त्यासाठी वापरण्यात येणारी शाई तसेच वॉटरमार्क या सर्वच गोष्टी उत्तम प्रतीच्या असल्याने त्या नोट्या अगदी ख-या वाटतात. त्या नोट्या ख-या नसून खोट्या आहेत, हे एखाद्या तज्ञाच्याच लक्षात येऊ शकते.
भारतात या बनावट नोटा पाठवण्यासाठी आयएसआय त्यांचा दर कमी करत असल्याची माहिती नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी व इतर गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पूर्वी १००० हजार रुपयांच्या बनावट नोटेसाठी ६०० ते ७०० रुपये मोजावे लागत असत मात्र आता त्यासाठी अवघे १०० ते २०० रुपये द्यावे लागतात. नोटांच्या दरांतील या फरकामुळे यातील दलालांना आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणा-यांना ८०-९० टक्क्यांचा फायदा होतो. ते या बनावट नोटांची डिलीव्हरी करतात आणि रोख रक्कम, एटीएम आणि तर मार्गांद्वारे पांढरा पैसा मिळवतात. दहशतवादी कारवायांसाठी लागणारा पैसा या मार्गातून उभा करण्याचा आयएसआयचा हा प्रयत्न आहे, असे एका अधिका-याने सांगितले. गेल्या काही वर्षांत भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अनेक दहशतवादी मॉड्युल्स आणि हवाला रॅकेट्स उध्वस्त केली होती.
२०११ सालापासून भारताबाहेरील शंभरहून अधिक रॅकेट्स उध्वस्त करण्यात आली असून ५५ ते ६० टक्के प्रकरणांमध्ये पाकिस्तानाचा थेट सहभाग होता, हे तपासातून लमोर आले आहे. मात्र असे असले तरीही बाकी उरलेल्या २ हजार कोटी रुपये अद्यापही फिरत असून ते दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाऊ शकतात असे एका अधिका-याने सांगितले.
या बनावट नोटा पाकिस्तानातूनच येत असल्याचे सिद्ध करता येईल असे पुरावे फॉरेन्सिक टेस्टद्वारे मिळाले आहेत. त्या नोटा पाकिस्तानी नोटांशी मिळत्याजुळत्या आहेत, हे दाखवणारे काही घटक त्यावर आहेत. त्यावर योग्य कारवाई करण्यासाठी आम्ही ही बाब 'फायनॅन्शिअल अॅक्श टास्क फोर्स'च्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.