नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ऑपरेशन सिंदूरनंतर कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या रुपात भारतीय महिलांचे सक्षमीकरण जगभरात अधोरेखित झाले आहे. याच पंगतीत आता इंडियन लाईफ लाईनची सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी एक कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. सोनाली मिश्रा असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्या १९९३ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत.
'डॅशिंग आयपीएस ऑफिसर' अशी प्रतिमा असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सोनाली मिश्रा यांचाही समावेश आहे. सध्या त्या मध्य प्रदेश पोलीस दलात अप्पर महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. देशभरातील शीर्षस्थ सुरक्षा यंत्रणांचे दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अचानक लक्ष वेधून घेतले होते. निमित्त होते, भोपाळ (मध्य प्रदेश) येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महासंमेलनाला संबोधित करण्यासाठी येण्याचे ठरले होते. त्यानुसार, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोनाली मिश्रा यांना सोपविण्यात आली होती. मिश्रा यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून सुरक्षा यंत्रणांकडून काैतुकाची थाप मिळवली.
तेव्हापासूनच त्यांना देशपातळीवरच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा आयपीएस लॉबीत होती. ती अखेर खरी ठरली. सोनाली मिश्रा यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) महासंचालक म्हणून नियुक्त केले जाणार असल्याचे आज स्पष्ट झाले. आरपीएफचे विद्यमान महासंचालक मनोज यादव हे ३१ जुलैला निवृत्त होणार असून, त्याचवेळी सोनाली मिश्रा या मनोज यादव यांच्याकडून आरपीएफची सूत्रे स्वीकारतील.
राष्ट्रीय परिषदेनंतर शिक्कामोर्तब
रेल्वेची सुरक्षा सांभाळणाऱ्या आरपीएफ आणि जीआरपीच्या देशभरातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांची दिल्लीत अलिकडेच राष्ट्रीय परिषद पार पडली. रेल्वे मंत्रालयातील बडी मंडळीदेखील यावेळी उपस्थित होती. या संपूर्ण परिषदेत रेल्वेतील गुन्हेगारी हाच चिंतनाचा विषय होता. परिषदेनंतर आयपीएस सोनाली मिश्रा यांच्या नावावर डीजी आरपीएफ म्हणून शिक्कामोर्तब झाले होते, अशी खास सूत्रांची माहिती आहे.
पहिल्या महिला अधिकारी
भारतीय जिवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या रेल्वेच्या संपत्तीची आणि प्रवाशांची सुरक्षा सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी आरपीएफच्या खांद्यावर असते. त्यामुळे आरपीएफचे प्रमुख म्हणून कर्तव्यतत्पर आयपीएस अधिकारीच नियुक्त केले जातात, असा आजपर्यंतच अनुभव आहे. सोनाली मिश्रा या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत.