रॉबर्ट वड्रा सापडले नव्या वादाच्या भोव-यात
By Admin | Updated: November 3, 2014 04:12 IST2014-11-03T04:12:20+5:302014-11-03T04:12:20+5:30
मीडिया प्रतिनिधींशी केलेल्या व्यवहारामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा नव्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत

रॉबर्ट वड्रा सापडले नव्या वादाच्या भोव-यात
नवी दिल्ली : मीडिया प्रतिनिधींशी केलेल्या व्यवहारामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा नव्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत. शनिवारी दिल्लीतील तारांकित हॉटेलमध्ये जिमच्या उद््घाटनानंतर एका वाहिनीच्या प्रतिनिधीने जमीन गैरव्यवहाराबाबत प्रश्न विचारला असता भडकलेल्या वड्रा यांनी त्याचा माइक ढकलून देत कॅमेरा बंद करण्यास भाग पाडले होते. या घटनेमुळे वड्रांवर जोरदार टीका सुरू झाली आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागल्यावर काँग्रेसने वड्रांची पाठराखण सुरू केली आहे. अशोकामध्ये हॉटेलमध्ये एएनआय न्यूज एजन्सीच्या रिपोर्टरने सुरुवातीला जिमबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा वड्रांनी त्याला सहज उत्तर दिले. पण हरियाणातील कथित जमीन घोटाळाप्रकरणी प्रश्न करताच ते चिडले. शिवाय हे चित्रीकरण कॅमेऱ्यातून डिलिट करण्याच्या सूचना वड्रांनी त्यांच्या अंगरक्षकांना दिल्या होत्या. या घटनेनंतर वड्रा यांच्या वतीने एक निवेदन प्रसृत करण्यात आले असून, त्यात नमूद केले आहे, की तो हॉटेलमधला खासगी कार्यक्रम होता व मीडिया तेथे नसेल अशी वड्रांची धारणा होती. त्यामुळेच तिथे आलेला खासगी फोटोग्राफर त्यांना असा का प्रश्न करीत आहे, अशी त्यांची भावना झाली. तो वाहिनीचा रिपोर्टर आहे हे त्यांना माहीत नव्हते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)