RK Ranjan Singh House Vandalised: केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या मणिपूरमधील निवासस्थानावर गुरुवारी (15 जून) रात्री उशिरा जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळच्या कोंगबा येथील राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड आणि जाळपोळ केली. हल्ल्याच्या वेळी मंत्री निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मंत्री आरके रंजन सिंह म्हणाले, "मी कोचीमध्ये आहे, माझ्या राज्यात (मणिपूर) नव्हतो. मी माझे घर खूप कष्टाने बांधले होते. माझ्या घरावर हल्ला झाला याचे मला दुःख आहे आणि माझ्या राज्यातील नागरिकांकडून अशा वृत्तीची अपेक्षा नव्हती. मला घरामध्ये आग लागल्याचे सांगण्यात आले, परंतु लोकांनी अग्नीशमन दालाला तेथे पोहोचू दिले नाही.''
''हा माझ्या आयुष्यावरचा हल्ला आहे, असे वाटते. यावरून मणिपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली असून सध्याचे सरकार शांतता निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे.” दरम्यान, मणिपूरमधील परिस्थिती पाहता इंटरनेट सेवा 20 जूनपर्यंत बंद करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये कर्फ्यू असूनही या आठवड्यात हल्ले आणि चकमकीच्या घटना समोर आल्या आहेत. याआधी गुरुवारी दुपारी मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्स आणि जमावामध्ये इम्फाळमध्ये चकमक झाली होती. जमावाने दोन घरे पेटवून दिली. सुमारे एक महिन्यापासून राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये होत असलेल्या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.